नवी दिल्ली – प्रजासत्ताकदिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी या घटनेच्या चौकशीला सुरुवात केली असून, तपासात नवीन माहिती समोर येत आहे. ट्रॅक्टर रॅलीदरम्यान गोंधळ आणि हिंसाचार पूर्वनियोजित होता असा गौप्यस्फोट दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून नियुक्त एसआयटी चौकशीतून करण्यात आला आहे.
दिल्लीतील आयटीओ आणि लाल किल्ल्यावर गोंधळ घालण्यासाठी काही समुहांना एकत्र येण्याच्या सूचना मिळाल्या होत्या. शेतकरी आंदोलनातील गर्दीत घुसून उपद्रवाची सुरुवात करणं आणि आंदोलकांच्या गर्दीचा भाग बनवून हिंसाचार घडवून आणायचा हा या समूहाचा उद्देश होता अशी माहिती समोर आली आहे.
त्यानुसार काम
पोलिसांच्या सूत्रांनुसार, इक्बाल सिंह नावाच्या एका व्यक्तीनं लाल किल्ल्यावर गर्दी जमवली केली. त्या गर्दीला भडकावून लाहोर गेट तोडण्यासाठी सांगितलं. त्यानुसार गर्दीनं कृती केली. इक्बाल सिंह याच्यावर पोलिसांनी ५० हजारांचे बक्षीस ठेवले आहे.
व्हिडिओ पुरावा
दिल्ली पोलिसांनी व्हिडिओ तपासून यापूर्वी १२ जणांची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ४४ एफआयआर नोंदविल्या आहेत. तसंच १५० जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांचे पथक सीसीटीव्ही कॅमेरे, व्हायरल व्हिडिओ, मीडिया कॅमेरे आणि दिल्ली पोलिसांच्या कॅमेरे अशा जवळपास पाच हजार व्हिडिओंचा तपास करत आहे. या तपासात पोलिसांनी ८ जणांची माहिती देणार्यांना बक्षीस जाहीर केलं आहे.
दीप सिद्धूवर बक्षीस
हिंसाचारप्रकरणी एसआयटीनं आतापर्यंत दोन जणांना अटक केली आहे. यातील मुख्य आरोपी दीप सिद्धू अद्याप फरारी असून सतत सोशल मीडियावर आपलं स्पष्टीकरण देत पोलिसांना आव्हान देत आहे. त्यामुळे दीप सिद्धूसह चार जणांची माहिती देणार्यांना एक लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे.