नवी दिल्ली – राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना शनिवारी रात्री एम्स कार्डियाक सेंटरच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. कार्डिओलॉजी विभागाचे प्राध्यापक डॉ. राकेश यादव यांच्या नेतृत्वात डॉक्टरांच्या पथकाने त्यांच्या प्रकृतीची तपासणी करून उपचार सुरु केले आहेत. सध्या त्यांची प्रकृती बरी असल्याचे सांगिले जात आहे.
लालू यादव यांना आधीच हृदय व मूत्रपिंडाचा आजार आहे. त्यांची बायपास शस्त्रक्रिया देखील झाली आहे. संसर्ग आणि श्वास घेण्यात अडचण झाल्याने प्रकृती गंभीर असताना त्यांना पाटण्याहून नवी दिल्लीच्या एम्स येथे पाठविण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. रांचीहून हवाई रुग्णवाहिकेतून रात्री त्यांना दिल्ली विमानतळावर आणण्यात आले.
त्यांच्या उपचारांसाठी एम्स येथे आगाऊ व्यवस्था करण्यात येऊन डॉक्टरांची टीमही सज्ज झाली होती. एम्समध्ये पोहोचल्यावर त्यांना थेट कार्डियाक सेंटरच्या आयसीयूमध्ये नेले गेले. त्यांच्यावर उपचार करणार्या डॉक्टरांच्या टीममध्ये पल्मोनरी मेडिसिन, नेफ्रॉलॉजी, क्रिटिकल केअरसह अनेक विभागातील डॉक्टरांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार लालूची प्रकृती चिंताजनक आहे.