पाटणा – बिहार विधानसभा निवडणुकीत समस्तीपूरमधील हसनपूर विधानसभा मतदारसंघ हॉट सीट झाला आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचे मोठे पुत्र आणि राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) नेते तेज प्रताप यादव येथून निवडणूक लढवत आहेत. तेज प्रताप यादव यांनी हसनपूर मधून उमेदवारी अर्ज दाखल केला. असून नामनिर्देशन पत्राद्वारे दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपली एकूण मालमत्ता सुमारे 2 कोटी 51 लाख रुपये दाखविली आहेत.
गेल्या महुआ विधानसभा मतदार संघाच्या उमेदवारीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रापेक्षा 5O लाख रुपये जास्त आहे. म्हणजेच गेल्या पाच वर्षांत तेज प्रतापची संपत्ती केवळ 50 लाखांनी वाढली आहे. तेजप्रताप यांच्या पाच बँक खात्यात एकूण 14,87,371 रुपये आहेत. जो सन 2015 च्या तुलनेत 10 लाख रुपये जास्त आहे.
तसेच निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार तेज प्रतापकडे 43 लाख रुपये किंमतीची बीएमडब्ल्यू कार आणि 46 लाख रुपये किंमतीची एक 1000 सीसी रेसिंग बाईक आहे. या दोन्ही वाहनांची किंमत समान होती. याशिवाय आरजेडी नेते तेज प्रताप यांच्याकडे 100 ग्रॅम दागिने आहेत, ज्याची किंमत सुमारे 4,26,300 रुपये आहे.
निवडणुकीच्या उमेदवारीसाठी प्रतिज्ञापत्रात दिलेल्या मालमत्तेचा संदर्भ देताना तेज प्रताप यांनी म्हटले आहे की, त्यांच्याकडे रोख फक्त दीड लाख रुपये आहे. तसेच त्याने विविध शेअर्समध्ये 25,10,000 रुपयांची गुंतवणूक केली आहे. आपल्याकडे लॅपटॉप आणि डेस्कटॉप देखील असल्याचे त्याने नमूद केले आहे. त्याचबरोबर तेज प्रतापवर 33 लाखांच्या कर्जाचा बोजा आहे.
त्याचप्रमाणे नामनिर्देशन पत्रासह दिलेल्या प्रतिज्ञापत्रात तेज प्रताप यांनी आपल्यावर काही गुन्हे दाखल असल्याचे म्हटले आहे. यापैकी पहिला आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन आणि दुसरे प्रकरण साथीच्या उल्लंघनाचे आहे. शस्त्रास्त्र कायद्याचा खटलाही सुरू आहे. एक त्यांच्या घटस्फोटाशी संबंधित आहे आणि दुसरे घरगुती हिंसाचाराबद्दल आहे. तेजप्रताप यादवने 12 मे 2018 रोजी ऐश्वर्याशी लग्न केले. ऐश्वर्या ही बिहारचे माजी मुख्यमंत्री दारोगा प्रसाद राय यांची नात असून ऐश्वर्याचे वडील चंद्रिका राय हे सारण जिल्ह्यातील परसा सीटवरुन आठ वेळा आमदार राहिले आहेत.