पुणे ः सामान्य माणसांना लालफितीचा फटका नेहमीच बसतो. परंतु आरोग्याशी निगडित बाबींतही लालफितीचा फटका बसत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. कोविडची लस तयार करणा-या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये कोविशिल्ड लशीचे साधारण साडेपाच कोटींहून अधिक डोस पडून असल्याची माहिती समोर आली आहे. शासकीय आदेशच्या विलंबामुळे या लशी पडून असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.
लशींच्या विलंबामुळे केंद्र सरकारनं पहिल्या टप्प्यात ३ कोटी नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण होण्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीकडून न वापरलेले लशीचे डोस सरकारनं खरेदी करावे आणि त्याचा वापर करावा यासाठी लॉबिंग सुरू आहे. सीआयआय ही पुण्यातील संस्था असूनही महाराष्ट्र सरकारलादेखील पुरेसे लसीचे डोस मिळाले नसल्याचं बोललं जात आहे. गेल्या आठवड्यात सिरमनं २० लाख डोस पाठवले. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं देशात कोव्हॅक्सीन आणि कोविशिल्ड लसीला तत्काळ मंजुरी दिली आहे. कोवॅक्सीनच्या चाचण्या झाल्याची टीकाही यापूर्वी करण्यात आली होती. मात्र भारत बायोटेकनं या चर्चा आणि दावे फेटाळून लावले आहेत.