नवी दिल्ली – ज्यांच्याकडे तपासाची सूत्रे आहेत, त्यांनीच लाच घेऊन यंत्रणेसोबत धोका करण्याचा प्रकार घडला. त्यामुळे सीबीआयलाच शरमेने मान खाली घालण्याची वेळ आहे. बँक फसवणूक प्रकरणात आरोपी असलेल्या कंपनीविरुद्ध सुरू असलेल्या तपासात हस्तक्षेप करणाऱ्यांकडून लाच घेतल्या प्रकरणी सीबीआयच्या चार कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात दोन पोलीस उपअधिक्षकही सहभागी आहेत. या प्रकरणात सुरक्षा यंत्रणेने गाझियाबाद येथील प्रशिक्षण अकादमी आणि १३ इतर ठिकाणांवर छापे मारले आहेत.
अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की. ज्या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे त्यात डीएसपी आर.के. ऋषी आणि आर.के. सांगवान, निरीक्षक कपील धनकड आणि स्टेनो समीर कुमार सिंग सामील आहेत. सीबीआय प्रवक्ते आर.सी. जोशी यांनी सांगितले की, आरोपींच्या १४ ठिकाणांवर छापे मारण्यात आले. त्यात दिल्ली, गाझियाबाद, नोएडा, गुरुग्राम, मेरठ आणि कानपूर सामील आहे. सीबीआयच्या अकादमीतील उच्चाधिकारी ऋषी यांच्या परिसरात छापे मारण्याची वेळ आली तेव्हा अधिकारी वर्गापुढे मोठे प्रश्न उभे होते. पण त्यांच्यापुढे पर्याय नव्हता.