नाशिक : घरकुल योजनेच्या मंजूर अनुदानात मृत व्यक्तीच्या जागी वारसदार लावून, उर्वरीत रक्कम मिळवून देण्याच्या मोबदल्यात पाच हजाराची लाच स्विकारणा-या दरी ता.जि.नाशिक येथील महिला सरपंचास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बेड्या ठोकल्या. ही कारवाई दरी गावातील संशयीत महिला सरपंचाच्या घरात करण्यात आली.
अलका अंबादास गांगोडे (रा.दरी ता.जि.नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर महिला सरपंचाचे नाव आहे. दरी गावातील तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावाने शबरी आवास घरकुल योजनेंतर्गत घर बांधण्यासाठी दीड लाख रूपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. मात्र तक्रारदाराच्या वडिलांचे निधन झाल्याने १५ हजाराचे अनुदान तक्रारदार यांच्या आईच्या नावाने मिळाले आहे. उर्वरीत अनुदान बाकी असल्याने तक्रारदार यांनी पाठपुरावा केला असता लाचखोर सरपंच गांगोडे यांनी अनुदान मंजूर करणे कामी केलेल्या मदतीसह मृतव्यक्तीच्या जागी वारसदार आणि पहिला हप्ता मिळवून देण्याच्या मोबदल्यात पाच हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला होता. निरीक्षक प्रभाकर निकम यांच्या पथकाने बुधवारी (दि.१४) दरी गावात सापळा लावला असता संशयीत सरपंच महिला एसीबीच्या जाळयात अडकली. स्व:ताच्या घरात तिला लाच स्विकारतांना अटक केली. या कारवाईने खळबळ उडाली असून शासकिय अधिकारी, कर्मचारी,लोकप्रतिनीधी तसेच खासगी इसमांकडून लाचेची मागणी झाल्यास संपर्क साधावा असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.