नाशिक – हौसिंग सोसायटीमध्ये आठ नवीन वीज कनेक्शन देण्यासााठी चार वर्षापूर्वी २४ हजाराची लाच घेतांना रंगेहात पकडलेल्या जेलरोड कार्यालयातील कनिष्ठ अभियंता दिपक चौधरी यांना न्यायालयाने मंगळवारी एक वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश क्र. ४ एस.टी. पांडेय यांनी हा निकाल दिला आहे.
नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात चार वर्षापूर्वी या प्रकरणाची सोसायटीचे चेअरमनने तक्रार केली होती. त्यानंतर २१ जुलै २०१६ रोजी सापळा रचण्यात आला होता. त्यात कनिष्ठ अभियंता हे रंगेहात पकडले गेले. त्यांच्याविरुध्द उपनगर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने दिलेल्या निकालात लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम ७ प्रमाणे १ वर्ष सक्त मजूरी व दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास साधी मजुरीची कैद, तर कलम १३ प्रमाणे १ वर्ष सक्त मजूरी व दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ महिना साधी कैदेची शिक्षा सुनावली आहे. सदर खटल्यास सरकारपक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता योगेश कापसे यांनी काम बघितले.