नवी दिल्ली – कोरोनावरील बहुप्रतिक्षित लसीकरण मोहीम शनिवारपासून सुरू होत आहे. पण ही लस लहान मुले, गर्भवती तसेच स्तनपान करणाऱ्या महिलांना देऊ नये, अशा सूचना केंद्र सरकारने राज्य सरकारांना दिल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीत १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीला लस देण्यात यावी, अशा सूचना आरोग्य मंत्रालयाने राज्यांना पत्राद्वारे दिल्या आहेत.
ज्या दोन लस देण्यात येणार आहेत, त्यांच्या चाचणीदरम्यान गर्भवती तसेच स्तनपान करणाऱ्या महिलांचा समावेश करण्यात आला नव्हता. त्यामुळे त्यांनाही लस देण्यात येणार नाही. या लसीत कोणताही बदल करू नये, अशा सूचना आरोग्य मंत्रालयाचे आरोग्य सचिव मनोहर अगनानी यांनी राज्यांना दिल्या आहेत.
जी लस सुरुवातीला दिली जाईल, दुसरा डोसही त्याचाच दिला जाईल. या दोन डोसमध्ये १४ दिवसांचे अंतर असेल. तसेच लस देण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची मेडिकल हिस्ट्री जाणून घ्यायला हवी. त्याला कोणतीही ऍलर्जी नाही ना, याची माहिती असायला हवी. लस दिल्यावर कोणालाही त्रास झाला तर त्यांना पॅरासीटेमॉल देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शिवाय लसीकरणाचे काम जे करणार आहेत, ते कर्मचारी पूर्णपणे प्रतिक्षित असावेत. म्हणजे कोणतीही परिस्थिती उद्भवली तरी ते सांभाळून घेऊ शकतील.