नवी दिल्ली, मुंबई – अमेरिकेत लस तयार करणाऱ्या फायजर इंक आणि बायोनटेक एसई या कंपन्यांनी १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांवर लसीचे परीक्षण सुरू केले आहे. कंपनीला हा विश्वास आहे की, २०२२ पर्यंत लसीकरण पूर्ण झालेले असेल. फायजरचे प्रवक्ते शेरोन कॅस्टिलो यांनी सांगितले आहे की, सुरुवातीच्या टप्प्यातील परीक्षणात दोन दिवसांपूर्वी एका कार्यकर्त्याला लस देण्यात आली होती. त्याच्यावर लशीचा होणारा प्रभाव निरीक्षणात आहे. सध्या लहान मुले आणि गर्भवती यांना लस नसून लवकरच ती उपलब्ध होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
फायजर कंपनीच्या लसीला अमेरिकेतील नियमांनुसार, सरकारने डिसेंबर २०२०च्या अखेरीस १६ वर्षे आणि त्यावरील वयाच्या लोकांसाठी मान्यता प्रदान केली होती. मॉडर्ना इंकनेही गेल्या आठवड्यात असेच परीक्षण सुरू केले आहे.
हे एक बाल चिकित्सा परीक्षण आहे. यात ६ महिन्यांपर्यंतच्या बाळांचाही समावेश असेल. सद्यस्थितीत फायजर आणि बायोनटेक एसईच्या व्हॅक्सीनचा वापर अमेरिकेत १६ आणि १७ वर्षांच्या बालकांवर केला जात आहे. मॉडर्नाचा शॉट १८ वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या लोकांना दिला जात आहे. मात्र लहान बाळांसाठी अद्याप कोणतीही कोव्हीड-१९ लस अधिकृत करण्यात आलेले नाही.
येत्या काळात या दोन्ही कंपन्या परीक्षण लांबवून तरुणांमधील अँटीबॉडीचा स्तर मोजणार आहेत. शिवाय लसीमुळे निर्माण झालेली सहनशिलता आणि रोगप्रतिकारशक्तीही तपासली जाणार आहे. २०२१ च्या दुसऱ्या सहामाहीत परीक्षणाचा डेटा मिळण्याची कंपनीला आशा आहे.