नाशिक – शेत जमीनीच्या वादातून लहान भावाने थेट मोठ्या भावाची हत्या केल्याची बाब समोर आली आहे. सिन्नर तालुक्यातील वडझिरे या गावात गोळ्या झाडून भावाची हत्या झाल्याने गावात खळबळ उडाली आहे. यात देविदास कुटे यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडझिरेचे ग्रामपंचायतीचे क्लार्क देविदास कुटे आणि त्याचे लहान भाऊ गणेश कुटे यांच्यात जमिनीवरून वाद होते. गणेश याने देविदास कुटे याच्याकडे जागेची मागणी केली होती. मात्र त्यास देविदास यांचा नकार होता. रात्रीच्या सुमारास गणेशने त्याच्या मित्राला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने देविदास कुटे यांच्या पत्नीला दरवाजा उघडण्यास भाग पाडले. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या गणेशने मोठ्या भावाच्या कपाळाच्या मधोमध गोळी झाडली. तशी कबुली स्वतः गणेशने दिली आहे. याप्रकरणी गणेश सह २ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा त्यांच्याकडून ताब्यात घेण्यात आला आहे. सिन्नर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध खुनाचा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.