मुंबई – कोव्हीड १९ ची लस घेतल्यानंतर त्याची नागरिकांवर रिअॅक्शन झाल्यास किंवा वाईट परिणाम झाल्यास रुग्णालयातील उपचाराचा खर्च विमा कंपन्यांन्या द्यावा लागणार आहे. यासंदर्भातील आदेश भारतीय विमा नियामक तसेच विकास प्राधिकरण (इरडा)ने अलीकडेच दिले. अर्थातच संबंधित व्यक्ती आरोग्य विमाधारक असणे आवश्यक असेल.
ज्याला लस घेतल्यानंतर रुग्णालयात भरती होऊन उपचार करण्याची आवश्यकता पडेल तो आपल्या आरोग्य विमा कंपनीकडून खर्च क्लेम करू शकतो. विमा नियामक प्राधिकरणाने काही दिवसांपूर्वीच कोव्हीड १९ चा उपचारही आरोग्य विम्यात सामील करून घेतली होती. मात्र त्यात लस घेतल्यानंतर काही झाल्यास काय करावे, याचा उल्लेख नव्हता. आता त्याचाही समावेश करण्यात आला आहे.
एलआयसीने सोपी केली प्रक्रिया
सरकारी विमा कंपनी एलआयसीने महामारीच्या संकटाचा सामना करणाऱ्या आपल्या ग्राहकांसाठी सेटलमेंट प्रक्रिया अतिशय सोपी केली आहे. कंपनीने म्हटले आहे की एलआयसीचे विमाधारक आपले कागदपत्र देशातील आमच्या कुठल्याही कार्यालयात जमा करू शकतात. ११३ स्थानिक कार्यालय आणि २ हजार ४८ शाखांशिवाय १ हजार ५२६ सॅटेलाईट कार्यालयांमध्ये मॅच्युरिटीशी संबंधित कागदपत्रे जमा करता येणार आहेत.