मुंबई – हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज यांनी कोरोनाची लस घेऊनही त्यांना कोरोनाची का लागण झाली याबाबत देशभरात चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात भारत बायोटेक कंपनीने स्पष्टीकरण दिले आहे.
मंत्री अनिल विज यांनी भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी स्वयंसेवक म्हणून तयारी दर्शविली. त्यानंतर त्यांनी कोरोना लस घेतली. त्यास काही दिवस उलटत नाही तोच त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले. यासंदर्भात भारत बायोटेकने एक निवेदन आज प्रसिद्ध केले आहे. त्यात म्हटले आहे की, कोरोनाचे दोन डोस घेणे बंधनकारक आहे. त्यानंतरच शरीरात प्रतिजैविके (अँटीबॉडीज) तयार होतात. यात २८ दिवसांचा कालावधी जातो. दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवसांनी लसीचा परिणाम दिसतो. दोन डोस घेतल्यानंतर लस प्रभावी ठरते, असे भारत बायोटेकने निवेदनात म्हटले आहे.