नवी दिल्ली – कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सुरू झालेल्या लसीकरण अभियानाअंतर्गत आतापर्यंत ५६ लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. लसीकरणामुळे आतापर्यंत कोणताही गंभीर प्रतिकूल परिणाम दिसून आला नाही, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली. अतिरिक्त सचिव मनोहर अगनानी यांनी सांगितलं की, आतापर्यंत ५६,३६,८६८ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. यामध्ये ५२,६६,१७५ आरोग्य कर्मचारी आणि ३,७०,६९३ स्वच्छता कर्मचार्यांच्या समावेश आहे.
वेगानं लसीकरणात भारत प्रथम
केवळ २१ दिवसांत ५० लाखांहून अधिक नागरिकांना कोविड लस देणारा भारत जगातील पहिला देश ठरला आहे. ५० लाख नागरिकांना लस देण्यासाठी अमेरिकेला २४ दिवस, ब्रिटेनला ४३ दिवस, इस्राईलला ४५ दिवस लागले होते.
५४.७ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना लस
को-विन अॅपवर नोंदणी केलेल्या ५४.७ टक्के आरोग्य कर्मचार्यांना कोरोना लस देण्यात आल्याची माहिती मनोहर अगनानी यांनी दिली. शनिवारी २.२० लाख लाभार्थांचे लसीकरण करण्यात आले. गेल्या २४ तासात लस दिल्यानंतर कोणचीही तब्येत बिघडली नाही किंवा कोणाचाही मृत्यू झाला नाही.
१३ राज्यात ६० टक्के लसीकरण
मनोहर अगनानी म्हणाले की, आतापर्यंत बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंडसह १३ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात ६० टक्के लसीकरण करण्यात आले आहे. दिल्ली, पंजाब, आसामसह १२ राज्यात ४० टक्क्यांहून कमी लसीकरण झाले आहे.
वेगानं लसीकरण करा
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी शनिवारी लसीकरण अभियानाचा आढावा घेतला. देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी लसीकरण वेगानं करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यासाठी राज्यात लसीकरण केंद्र वाढवण्यास सांगण्यात आलं आहे. तसंच २० फेब्रुवारीपर्यंत सर्व आरोग्य कर्मचार्यांचे लसीकरण करण्यास सांगण्यात आलं आहे. को-विन अॅपचं दुसरं व्हर्जन लवकरच आणलं जाईल, असंही राजेश भूषण यांनी सांगितलं.