नवी दिल्ली – लष्कर भरती घोटाळ्याचे धागेदोरे देशात पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत आणि उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत पसरलेले आहेत. यामध्ये एसएसबी सलेक्शन सेंटर, रुग्णालय, भरती मुख्यालय आणि अनेक युनिटचे अधिकारी या घोटाळ्यात सहभागी आहेत. या घोटाळ्यात लाच म्हणून दिलेले पैसे अधिकार्यांची पत्नी, आई, वडील, मेव्हणा, महिला मित्र तसंच नातेवाईकांपर्यंत पोहोचले आहेत. हे सगळे जण सीबीआय चौकशीच्या फेर्यात आले आहेत.
सीबीआयनं फास आवळला
लष्काराच्या खात्रिलायक सूत्रांनुसार, लष्करी अधिकारी आणि इतर काही लोकांनी कंत्राटी आणि अस्वीकृत प्रशिक्षणार्थ्यांकडून लाच घेऊन वैद्यकीय परीक्षणात उत्तीर्ण केलं आहे. लष्करानं भरती घोटाळ्याची चौकशी तपास संस्थेकडून केल्यानंतर मोठं रॅकेटच समोर आलं. या रॅकेटमध्ये मेजरसह दोन डझन लष्करी अधिकारी, त्यांचे नातावाईक आणि जवळचे लोक सहभागी असल्याची पुष्टी झाली आहे.
घोटाळ्यात सहभागी लोकांचं जाळं मोठं असू शकतं, अशी शंका लष्करानं व्यक्त केली आहे. घोटाळ्याचे धागेदोरे पूर्ण देशात पसरलेले आहेत. एसएसबी सलेक्शन सेंटर (उत्तर), कपूरथला (पंजाब) चे ग्रुप टेस्टिंग अधिकारी मेजर भावेश कुमार यांची पत्नी देव्यानी, त्यांचे वडील सुरेंद्र कुमार आणि आई उषा कुमावत यांच्यापर्यंत लाचेची रक्कम पोहोचली आहे. सर्व्हिस सलेक्शन सेंटर कपूरथलाचे लेफ्टनंट कर्नल सुरेंद्र सिंह यांचे मेव्हणे, दिल्लीतील पालम विहारचे रहिवासी भूपेंद्र बजाज यांचंही नाव या घोटाळ्यात आलं आहे.
कपूरथला ते दिल्ली, बरेली, बंगरुळू, चेन्नई, गुवाहाटीपर्यंत जाळं
एसएसबी सलेक्शन सेंटर कपूरथलासह बेस हॉस्पिटल, दिल्ली कँट, लष्करी हवाई संरक्षण विशाखापट्टणम, आर्डिनन्स डिव्हिजन बरेली, भरती संचालनालय नवी दिल्ली, माउंटेन डिव्हीजन गुवाहाटी, ओटीए चेन्नई, आर्मी सर्व्हिस कॉर्प्स बंगळुरू, मेडिकल बोर्ड सलेक्शन, बेस हॉस्पिटल
दिल्ली, वाहन डेपो दिल्लीसह अनेक ठिकाणी तैनात लष्करी अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबातील लोक आणि अनेक नागरिक या घोटाळ्यात सहभागी आहेत.
लेफ्टनंट कर्नल भगवानचा व्हिडिओ जप्त
लष्कर भरती घोटाळ्याचा मास्टरमाईंड लेफ्टनंट कर्नल भगवानचा एक व्हिडिओ जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये तो या प्रकरणात दलालाची भूमिका निभावणार्या दिल्लीतील बेस हॉस्पिटलचा नायब सुभेदार कुलदीप सिंहकडून पाकिट घेताना दिसत आहेत. लेफ्टनंट कर्नल सुरेंद्र सिंहचा मोबाईल आणि लॅपटॉपसुद्धा जप्त करण्यात आला आहे.
लाखोंची लाच घेण्याचा आरोप
लष्करी अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना रोख, धनादेश, यूपीआय, आरटीजीएस आणि इतर माध्यमांतून लाचेची रक्कम पोहोचवण्यात आली आहे. नायब सुभेदार कुलदीप सिंहला रोख रकमेसह यूपीआयद्वारे ५० हजार रुपये. धनादेशाद्वारे १.५० लाख रुपये मिळाले आहेत. लेफ्टनंट सुरेंद्र सिंहला १०-१५ प्रशिक्षणार्थींना उत्तीर्ण करण्याच्या बदल्यात रोख लाच देण्यात आली. बँकेतून एक लाख रुपये हस्तांतरित करण्यात आले. मेजर भावेश कुमारनं १०-११ प्रशिक्षणार्थींची निवड करण्यासाठी लाच घेतली. त्यांच्या कुटुंबीयांच्या खात्यांमध्ये पैसे पाठवण्यात आले आहेत.