नवी दिल्ली – भारतीय लष्कर प्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांना नेपाळ सरकारने जनरल हे मानद पद देऊन गौरविले आहे. नेपाळचे अध्यक्ष विद्या देवी भंडारी याच्या हस्ते हा सन्मान जनरल नरवणे यांना एका समारंभात देण्यात आला. नरवणे हे सध्या नेपाळ दौऱ्यावर आहेत.
सदर पारंपरिक सन्मान हा दोन देशांच्या सैन्या दरम्यानच्या दृढ संबंधाची ओळख म्हणून दिला जाणारा आहे. हा सन्मान १९५० मध्ये सुरू करण्यात आला. ‘जनरल ऑफ इंडियन आर्मी’ या मानद रँकद्वारे नेपाळने भारतीय लष्करप्रमुखांचा गौरव केला आहे. जुन्या परंपरेनुसार हा सन्मान देण्याचा नेपाळचा निर्णय अलीकडच्या काही महिन्यांत दोन्ही शेजारच्या देशांमधील सीमा विवादांवरून खूप महत्त्वाचा मानला जात आहे.
नेपाळ दौर्यात जनरल नरवणे हे नेपाळचे सेनापती जनरल पूर्ण चंद्र थापा आणि संरक्षण मंत्री ईश्वर पोखरेल यांच्यासह नेपाळी सैन्याच्या इतर अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत महत्त्वपूर्ण चर्चा करणार आहेत. या दौर्यावर दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य आणखी बळकट करण्यासाठी प्रयत्न होत आहेत.
जनरल नरवणे यांची भेट ही फेब्रुवारीत होणार होती. परंतु दोन्ही देशांमध्ये कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे पुढे ढकलण्यात आल्याचे काठमांडूतील नेपाळी लष्कराच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
दरम्यान, कैलास मानसरोवरला भेट देण्यासाठी बांधलेला हा रस्ता आपल्या सीमेवरुन जात असल्याचा दावा नेपाळने केला होता. तथापि, रस्ता भारतीय सीमेत होता असे भारताने ठामपणे सांगितले. यानंतर नेपाळने मेमध्येच आपला नवीन राजकीय नकाशा जाहीर केला आणि उत्तराखंडमधील लिपुलेख, कलापाणी आणि लिंपियाधुरा हे भाग नेपाळमध्ये असल्याचे दर्शविले आहे. यामुळे दोन्ही देशांमधील संबंध बिघडले आहेत. या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर, नवी दिल्लीहून नेपाळची ही पहिली उच्चस्तरीय भेट आहे, ज्यामध्ये दोन्ही देशांमधील वाद संपुष्टात येण्याची शक्यता आहे.