…….
देशाच्या राजकारणातील सर्वात मोठा दलीत चेहरा म्हणून ख्यात असणारे रामविलास पासवान यांच्या निधनाने एका उज्ज्वल राजकीय अध्यायाचा अंत झाला आहे. आठ वेळेस लोकसभेत निवडून गेल्यानंतर आठ वेळेस केंद्रीय मंत्री बनण्याचा त्यांचा पराक्रम अद्याप तरी कुणीही मोडू शकलेला नाही. विशेष म्हणजे संयुक्त समाजवादी पक्ष, लोकदल, जनता पक्ष, जनता दल, जेडीयू ते स्वत:च्या लोकजनशक्ती पक्षापर्यंतचा त्यांचा प्रवास हा कुणालाही थक्क करणाराच होता. विश्वनाथ प्रताप सिंह ते नरेंद्र मोदी या गत ३१ वर्षातील नरसिंम्हा राव यांचा अपवाद वगळता प्रत्येक पंतप्रधानांच्या सरकारमध्ये मंत्रीपद मिळवण्यासाठी असणारे राजकीय कौशल्य हे अजून कुणाला लवकर जमेल असे वाटत नाही.
शरद पवार यांना राजकीय वारे ओळखण्याचे होकायंत्र म्हणून उपमा मिळालेली आहे. मात्र पवारांइतके वलय वा जनाधार नसतांनाही केंद्रीय राजकारणावर पक्की मांड रोवून बसण्यात ते पारंगत होते. खरं तर बिहारचा विचार केला असता लालू, नितीश यांच्या प्रमाणे लोकप्रियता नसतांनाही दिल्लीतील बिहारचा चेहरा म्हणून त्यांनी तब्बल तीन दशकांपर्यंत विविध मंत्रीपदांवर केलेले काम हे कमी आश्चर्यकारक नाही.
यात एक तर त्यांनी राज्याच्या राजकारणापासून आपल्याला जाणीवपूर्वक दूर ठेवत राष्ट्रीय राजकारणात दलीत नेता म्हणून प्रतिमा उभी करण्यात ते यशस्वी झाले. याच्या जोडीला अनेक प्रादेशिक नेत्यांनी पंतप्रधानपदाबाबत अनेकदा उघड वा सुप्त इच्छा व्यक्त केल्या असतांना रामविलास पासवान यांनी कधी याबाबत उत्सुकता न दाखविल्याचा लाभ त्यांना प्रत्येक मंत्रीमंडळात जागा मिळवतांना झाला. याचमुळे पराकोटीची परस्परविरोधी विचारधारा असणार्या सरकारांमध्ये ते अगदी सहजगत्या सामावून गेले. कायम सत्तेच्या सावलीत राहतांनाही ते फार जास्त कधी वादात सापडले नाहीत. खरं तर राजकारणात सर्वांशी जुळवून घेण्याचे स्कील हे किती प्रमाणात फलदायी ठरू शकते याचे उत्तम उदाहरण हे रामविलास पासवान यांच्या राजकिय कारकिर्दीकडे पाहून आपल्याला सहजपणे समजू शकते.
रामविलास पासवान यांचे जाणे हे आंबेडकरी राजकारणातील एका अध्यायाचा अंत असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. गेल्या तीन दशकांपासून देशात मंडल विरूध्द कमंडलची तुंबळ लढाई सुरू असतांना या दोन्ही बाजूंच्या मंत्रीमंडळात सहभागी होतांनाही पासवान यांनी त्यांची दलीत व शोषितांचा नेता म्हणून असणारी ओळख कधी पुसली नाही. त्यांनी सातत्याने बहुजन हिताचा विचार केला. आज मंडलवादी नेत्यांपैकी मुलायम थकले असून लालू राजकीयदृष्टया गलीतगात्र झाले आहेत. या पार्श्वभूमिवर, पासवान यांच्या जाण्याने दलीत, ओबीसी राजकारणाला धक्का बसला आहे.
केंद्रीय राजकारणाचा संदर्भ लक्षात घेतला असता, अनेक दलीत नेत्यांनी आपल्या कामाची अमिट छाप उमटवली आहे. यात बाबू जगजीवनराम यांच्या नंतरचे नाव हे नि:संशयपणे रामविलास पासवान यांचेच घेतले जाईल यात शंकाच नाही. अर्थात, लवचीकता व सर्वसमावेशकता हे त्यांचे गुण देखील भारतीय राजकारणात कुणाला विसरता येणार नाही हे देखील तितकेच खरे !