मुंबई – बदलत्या हवामानामुळे उद्भवणाऱ्या आजारांपासून संरक्षण करण्यासाठी मसाल्याच्या रूपात वापरले जाणारे लवंग बऱ्याच आजारांवर गुणकारी आहे. आयुर्वेद शास्त्रात देखील लवंगांचा उपयोग करून आजारांवर औषध तयार केले जाते. पुढे येणारा हिवाळा ऋतू पाहता, आजार उद्भवण्याची शक्यता असल्याने दैनंदिन वापरात लवंगाचा उपयोग करावा असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
लवंग हा औषधी गुणधर्मांचा खजिना आहे. यात प्रथिने, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, लोह, सोडियम आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड भरपूर प्रमाणात असतात. सर्दीपासून उत्पन्न होणाऱ्या बहुतांश रोगांसाठी लवंग गुणकारी असल्याचे स्पष्ट झाले आहे. संपूर्ण लवंगा तोंडात ठेवल्याने थंडीपासून होणारा त्रास कमी होतो. हिवाळ्यात शरीरात उबदारपणा टिकवून ठेवण्याचे काम लवंग करते. तसेच चहा करतेवेळी त्यात लवंग टाकल्याने आरोग्यासाठी ते फायदेशीर असते. तसेच खोकला येत असल्यास लवंग खाल्ल्याने खोकला कमी होतो.
पोटाशी संबंधित आजारांमध्ये लवंग अत्यंत प्रभावी आहे. अपचन, पोटाचा वायू किंवा बद्धकोष्ठतेमुळे ग्रस्त असलेल्यांसाठी लवंगा खूप फायदेशीर असतात. सकाळी रिकाम्या पोटावर एका ग्लास पाण्यात लवंगाच्या तेलाचे काही थेंब पिल्याने शरीरास आराम मिळतो. तोंडाचा वास येत असल्याची तक्रार अनेक जण करत असतात, त्यासाठी घराबाहेर पडतेवेळी दातांमध्ये किंवा जिभेवर लवंग ठेवल्यास अशी समस्या उद्भवणार नाही. दररोज संपूर्ण लवंगा तोंडात ठेवल्याने दुर्गंधी दूर होते.