नाशिक – भारतरत्न आणि गानकोकिळा लता मंगेशकर अर्थात लता दीदी यांचा आज वाढदिवस. याचनिमित्ताने नाशिकचे गायक संजय गीते आणि आंतरराष्ट्रीय चित्रकार राजेश सावंत यांनी या चित्रसंगीताद्वारे दिलेल्या या अनोख्या शुभेच्छा. अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग असल्याचा दावा सावंत आणि गीते यांनी केला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की बघा
प्रख्यात आंतरराष्ट्रीय चित्रकार राजेश सावंत यांच्या “सावंत ब्रदर्स आर्ट फाउंडेशन” आणि प्रसिद्ध संगीतकार गायक संजय गिते यांच्या “सोर्स म्युझिक स्टुडिओ, नाशिक या चित्र व संगीत जगतातील कला संस्थांच्या समन्वयातून गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा ९१ वा वाढदिवस अप्रतिम कलाकृती सादर करून अनोख्या पध्दतीने साजरा करण्यात आला.
या अनोख्या कल्पनेबाबत सांगताना संजय गिते म्हणाले की, लता मंगेशकरांची हजारो गाणी असली तरी त्यांच्या जीवनावर एकही गाणे नव्हते. कोविडच्या काळात ज्यांचा स्वर हा औषधासारखा,अमृता समान आहे, हा मूळ विचार आम्ही ठेवला. त्यानंतर मी ‘दुःख दर्द मे दवा दुवा है, ये दुनिया मे एकही स्वर, असे लिहलेे त्यानंतर दिल्लीतील ज्येष्ठ हिंदी कवी लक्ष्मीनारायण भाला यांच्याकडून या संकल्पनेवर पूर्ण नवे गीत लिहून घेतले. २००४ साली माझ्या संगीत दिगदर्शनासाठी लता मंगेशकर यांनी सिनेमासाठी गायन केले होते. आता मात्र साक्षात हे गाणं सिनेमासाठी नव्हे तर भारतरत्न लतादिदीसाठी आहे. ते मी हे स्वरबद्ध केले. लताजींच्या थोर व्यक्तित्वाचे हे गौरव गीत”जगात प्रथमच” संगीत चित्रफितीद्वारे सादर केले जात आहे
सूर सरस्वतीच्या गीत वंदनेचे मुख्य आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय चित्रकार राजेश सावंत यांनी लता दिदींचे त्यांच्या खास चित्रशैलीत साकारलेले पोट्रेट ,लता मंगेशकर यांच्या पोट्रेट पेंटिंगची निर्मिती क्रिया आणि त्याच्या व्हिडीओ च्या पार्श्वभूमीवर सदर सुमधुर गाण्याचा स्वर आहे. लता दिदींच्या चेहऱ्यावरील निखळ हास्य व त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाला अधोरेखित करणारी भावमुद्रा अत्यंत प्रभावीपणे चित्रकार राजेश सावंत यांनी मोठ्या खुबीने आणि सहजतेने चित्रित केलेले आहेत. या वास्तववादी पोट्रेटच्या निर्मितीच्या प्रारंभा पासून तर पोट्रेटच्या अंतिम टप्प्याच्या प्रक्रियेतील कुंचल्यांचा कॅनव्हास वरील ओघवता सप्तरंगी प्रवास सदर चित्रफितीतील प्रात्यक्षिकात अवघ्या ४ मिनिटात रसिक अनुभवू शकतात. सदर पोट्रेट पेंटिंग हे ऍक्रीलीक रंगमाध्यमात कॅनव्हासवर चित्रित केले गेले आहे, हा कलात्मक प्रयत्न कौतुकास्पद ठरला आहे, चित्रकला व संगीत कलेच्या दुहेरी संगमातून “स्वरचित्र” ही अतिशय सृजनशील चित्रफित रसिकांना नक्कीच वेगळी अनुभूती देऊन जात आहे .
सदर “स्वरचित्र” चित्रफीत लताजी यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त २८ सप्टेंबरला सकाळी ९ वा. १ मिनिटांनी हे गीत संजय गीते सोर्स म्युझिक हब ह्या यु ट्यूब चॅनल वर जगभरातील सोशल मीडियावर रसिकांसाठी विनामूल्य प्रदर्शित केले आहे.अशा पद्धतीने स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर यांना आगळ्या वेगळ्या प्रकारे त्यांच्या संगीत जगतातील महान कार्याला ह्या निमित्ताने ही कलात्मक मानवंदना नाशिकचे चित्रकार राजेश सावंत व संगीतकार, गायक संजय गीते यांनी दिली आहे.
सदर चित्रफीतीच्या निर्मितीत आंतरराष्ट्रीय चित्रकार प्रफुल्ल सावंत यांचे विशेष सहकार्य लाभले तसेच, गीतरचना- दिल्ली चे प्रसिद्ध कवी श्री लक्ष्मीनारायण भाला ,संगीत-संजय गीते,गायन-संजय/ श्रावणी गीते ,कीबोर्ड-समीर शेख,बासरी-मनोज गुरव, तबला-अनिल गीते, गिटार-निलेश सोनवणे ध्वनिमुद्रण-सोर्स म्युझिक स्टुडिओ ,साऊंड इंजिनियर-सुमंत गीते, आदी चे बहुमूल्य सहकार्य लाभले.