लडाखमध्ये वादळापूर्वीची शांतता आहे का?
सध्या लडाखमध्ये शांतता दिसत असली तरी ही शांतता वरवरची आहे. भारताने अनपेक्षितपणे चीनला केलेला अटकाव आणि गोठवणारा हिवाळा यामुळे चीनचे सर्व गणित विस्कळीत झाले आहे.
लडाखचा मोठा भूभाग काबिज करून भारतावर जाचक अटी लादायच्या आणि भारत हा चीनपुढे नमलेला देश आहे हे जगाला व अमेरिकेला दाखवून मग तैवानविरुद्ध कारवाई सुरू करायची व त्यानिमित्ताने अमेरिकेलाही आव्हान द्यायचे असा शी जिनपिंग यांचा डाव होता. पण भारताने हा डाव उधळून लावला आहे. आता निदान जानेवारी संपेपर्यंत तरी चीनला लडाखमध्ये फार काही करता येईल असे वाटत नाही, पण एकदा थंडी कमी झाली आणि बर्फ वितळून वाटा मोकळ्या झाल्या की, चीन काही हालचाल करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भारतीय सैन्याने ती शक्यता लक्षात घेऊनच आपली सज्जता आणखी वाढविण्यास सुरुवात केली आहे. लडाखमधील या अस्वस्थ शांततेंच्या काळात भारताने आपली सर्व शस्त्रे-अस्त्रे धार लावून सज्ज केली आहेत. अनेक क्षेपणास्त्रांच्या चाचण्या केल्या आहेत, उपग्रहांना टेहळणीसाठी सज्ज केले आहे, आवश्यक ती लष्करी सामुग्री जगात जिथे उपलब्ध असेल तेथून घेतली आहे.
अमेरिकेशी संरक्षण करार झालेला असल्यामुळे त्या देशाशी आवश्यक ते सहकार्य सुरू झाले आहे. अमेरिकेत सत्तांतराचा काळ चालू असला तरी चीन आघाडीवर पेंटगॉन पूर्ण जागरूक आहे. ट्रम्प प्रशासनाने जाताजाता चीनची जेवढी अडचण करता येईल ती करण्याचा चंग बांधलेला दिसतो, त्यामुळे अमेरिकन कंपन्यांवर चीनशी सहकार्य करण्यावर निर्बंध अधिक कडक केले आहेत.
उन्हाळ्यात लडाख सीमेवर चीन पुन्हा काही कुरापत काढण्याची शक्यता लक्षात घेऊन लष्कराने तेथील माऊंटन स्ट्राईक कोअरला तोफखान्याची स्वतंत्र ब्रिगेड दिली आहे. लडाखच्या पर्वतीय प्रदेशांत व पठारी भागात या तोफखान्याचा मोठा उपयोग लष्कराला होईल. वरून विमाने आणि हेलिकॉप्टर यांच्या माऱ्याला तोफखान्याचा हा मारा पूरक ठरेल.
सध्याच्या लडाखमधील कथित शांततेच्या काळात चीन स्वस्थ बसला आहे असे मानण्याचे कारण नाही, चिनी सैन्य थंडीने हैराण झाले असले तरी त्याच्याकडे जे लष्करी तंत्रज्ञान आहे, त्याचा वापर सुरू आहे पण हे तंत्रज्ञान अजून तरी फारसे प्रभावी ठरलेले दिसत नाही. भारतीय सैन्याच्या हालचाली टिपण्यासाठी सेन्सॉर व नाईट व्हिजन डिव्हाईसचा वापर चालू असला तरी भारतीय सैन्याने हे सेन्सॉर्स निकामी करून चिनी सैन्याला चकवा देत कैलास श्रेणीतील शिखरे अलगद ताब्यात घेतली. त्यामुळे या सेन्सॉर्सवर विश्वास ठेवून चिनी सैन्याला स्वस्थ बसता येत नाही.
गोठवणाऱ्या थंडीत सीमेवर गस्त घालावी लागत आहे. त्याच्या परिणामी चिनी सैनिक आजारी पडण्याचे प्रमाण वाढत आहे. चीनकडून भारतावर सतत सायबर हल्ले होत असतात, पण आता त्या हल्ल्यांची पद्धती कळल्यामुळे हे हल्ले निष्प्रभ करता येतात, पण काही वेळेला सायबर सुरक्षेतील काही त्रुटींमुळे हे हल्ले यशस्वीही होतात. ऑक्टोबरमध्ये मुंबईत खंडित झालेला वीजपुरवठा हा अशा सायबर हल्ल्यामुळे झाला असावा असा कयास आहे, पण हा हल्ला लगेच परतवून लावला व वीजपुरवठा सुरळीत झाला. थोडक्यात चीन भारताविरुद्ध लष्करी तंत्रज्ञान वापरत आहे, पण त्याला म्हणावे असे यश येताना सध्यातरी दिसत नाही. आता अमेरिकेच्या सहकार्यामुळे आता यासंबंधातली सुरक्षा अधिक बळकट करता येईल.
हिंदी महासागरात मलबार व क्वाड नौदल कवायतींमुळे एक भक्कम सुरक्षा व्यवस्था निर्माण झाली आहे व ती आणखी बळकट करण्यात येत आहे. विशेषत या कवायती दरम्यान चार देशांच्या संपर्क व्यवस्थेत ज्या काही त्रुटी दिसून आल्या त्या दूर करण्यात येत आहेत. त्यामुळे चीनला हिंदी महासागरात वावर करणे सोपे जाणार नाही.
लडाखमध्ये आपल्या हाती यश लागेल याची आता चीनला खात्री वाटत नाही, त्यामुळे त्याने आता पाकिस्तानातून आणखी एक आघाडी उघडता यावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. विशेषत: पाकिस्तानी हवाईदलाला टेकू देऊन उभे करण्याचा चीनचा प्रयत्न चालला आहे. एकूणच रात्र वैऱ्याची आहे आणि सतत जागे राहणे आवश्यक आहे.