नवी दिल्ली – अभिनेत्री परिणिता चोप्रा हिचा नुकताच ‘सायना’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटातील परिणिताच्या कामाचे चांगलेच कौतुक होत आहे. पण यासोबतच मध्यंतरीच्या काळात ती जाड झाल्याने त्यावरही नेटकऱ्यांनी टीका केली आहे. या कॉमेंट्स ऐकून आपल्याला काय वाटायचे हे परिणिताने बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.
मी चांगली दिसत नव्हते आणि त्या काळात मी काही करतही नव्हते. त्यामुळे लोकांच म्हणणं मी एवढं मनावर घेतलं नाही. पण मी काही काम करत असते आणि तरी लोकांनी अशी टीका केली असती, तर निश्चितच मला वाईट वाटलं असतं. तरीही मी याकडे लक्ष दिले नाही आणि मला काय करायचं आहे यावर फोकस केलं. त्यासोबतच फिटनेसकडे लक्ष देणं सुरू होतं. कारण, ६ महिने किंवा फारफार तर वर्षभरात मी पुन्हा फिट झालेच असते, असे ती सांगते. एखाद्यावर सातत्याने टीका करणे, ही जगातील अत्यंत वाईट गोष्ट आहे. खरंतर फिटनेसची काळजी प्रत्येकानेच घ्यायला हवी. पण लोक ते करत नाहीत आणि दुसऱ्याला नावं ठेवतात. प्रत्येकाने केवळ फिट असायला हवं, पण लोकं सतत दुसऱ्याशी तुलना करत राहतात, जे चुकीचं आहे. अशी माणसं ही नकारात्मक विचार करणारी असतात.
परिणिताचा सध्या ‘सायना’ चित्रपट आला असून लवकरच ती ऍनिमल या चित्रपटातही दिसणार आहे. यात तिच्यासोबत रणबीर कपूर आणि अनिल कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.