मुंबई – वजन वाढल्याने आणि लठ्ठ झाल्याने गेले काही दिवस अभिनेता फरदीन खान सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल झाला होता. याबद्दल त्याने कोणतीच टिप्पणी केली नाही. त्यानंतर त्याने नुकताच आपला वजन कमी केल्याचा फोटो शेअर केला होता. ज्या पद्धतीने त्याला ट्रोल केले गेले त्यावर त्याने आपले मौन सोडले आहे.
सुंदर दिसणे हा माझ्या पेशाचा भाग आहे. त्यामुळे चाहत्यांची अशीच अपेक्षा असते. त्यात काही बदल झालेला दिसला की, तुमच्यावर टीका करतात. ज्यायोगे तुम्ही पुन्हा चांगले दिसावे, अशी त्यांची अपेक्षा असते. चांगले दिसणे, व्यवस्थित, टापटीप राहणे हे गरजेचे आहे. पण, दुसऱ्यासाठी नाही तर स्वतःसाठी, असे फरदीन सांगतो. मुळात छान राहणे हे आपल्या दिसण्याशी नाही तर आपल्या वाटण्याशी संबंधित आहे.
आपण जसे आहोत तसे आपल्याला छान वाटले पाहिजे. त्यामुळे आपल्याला फ्रेश, आनंदी वाटते का, याचा विचार करणे गरजेचे आहे. बाकी सुंदर दिसणे हा आमच्या पेशाचा अपरिहार्य भाग आहे. त्यामुळे त्याबद्दल चाहत्यांनी टीका करणे यात काही विशेष नाही.
जवळपास दशकभराने फरदीन खान पुन्हा एकदा अभिनयाच्या क्षेत्रात येतो आहे. मध्यंतरीचा काही काळ त्याने लंडनमध्ये घालवला. आणि आता तो पुन्हा एकदा पुनरागमन करतो आहे. सेटवर असणं, तेथील वातावरण या सगळ्या गोष्टी मी नेहमीच मिस करतो. अभिनय हा माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे कधी एकदा माझं काम सुरु करतो याची मी स्वतःच आतुरतेने वाट पहात होतो. या १० वर्षांत इंडस्ट्रीमध्ये अनेक बदल झाले आहेत. नवनवीन प्लॅटफॉर्म्स कलाकारांना मिळत आहेत, हे चांगले आहे. प्रेक्षकांची आवड निवड देखील बदलते आहे. त्यामुळे मी जरी पुनरागमन करत असलो, तरी माझी मानसिकता नवोदित कलाकाराची आहे.