लघु उद्योजकाची व्यथा
शेतकऱ्यांनी जशी एकी दाखवून सरकारला खिंडीत पकडले आहे. तशाच प्रकारे लघु व अन्य उद्योजकांनी एकी दाखवली तर सरकार झुकल्याशिवाय राहणार नाही.
शेतकऱ्यांना त्रास देणारे व्यापारी व दलाल आहेत. परंतु उद्योजकाला त्रास देणारे सरकारी जाचक कायदे जसे MIDC, DIC, प्रदूषण नियंत्रण मंडळ, विद्युत बोर्ड, शॉप ऍक्ट, प्रॉव्हिडंट फंड, GST, आयकर, प्रोफेशनल टॅक्स, नगरपालिका, बँक, युनियनबाजी, मोठ्या उद्योगांची दादागिरी अशा अनेक बाबी आहेत. या साऱ्यात बिचारा लघु उद्योजक भरडला जातो. कोरोनाने अनेक उद्योग बंद पडले आहेत.
हल्ली तर MIDC मध्ये दलाल भयंकर जोरात आहेत. त्यांच्या धंद्याला MRP नाही. त्यामुळे काही लघुउद्योजकांनी दलाली करणे पसंत केले आहे. यातील काही जण वेगवेगळ्या औद्योगिक संघटनांमध्ये आहेत. या भीषण परिस्थितीमुळे नवीन उद्योजक निर्माण होत नाहीत. खऱ्या अर्थाने उद्योग करणारा उद्योजक या दुष्टचक्रात अडकला आहे. या जाचातून मुक्तता हवी असल्यास शेतकऱ्यांसारखे आंदोलन उभारावे लागेल. याचा सर्वांनी गांभिर्याने विचार करावा.
– जयप्रकाश जोशी, उद्योजक, नाशिक