घोटी (ता. इगतपुरी) – तालुक्यात झालेल्या एका लग्न सोहळ्यात नवरदेवासहित तब्बल १६ वऱ्हाडी कोरोना बाधित झाल्याने आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहेत. तसेच, ही वार्ता तालुक्यात पसरल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे.
आज दिवसभरात इगतपुरी तालुक्यात जवळपास ३० रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये दोन शिक्षक हे टाकेद परिसरामध्ये कोरोनाची लस घेण्यासाठी गेले असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दिवसेंदिवस ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.
दोन दिवसापूर्वी तालुक्यातील मालुंजे परिसरामध्ये एका विवाह सोहळ्याला मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे आता पुढे आले आहे. विशेष म्हणजे दोन विवाह एकाच वेळेस आयोजित केल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने लग्न समारंभाला हजेरी लावलेल्या वऱ्हाडी मंडळींच्या घरोघरी जाऊन कोरोना चाचणी करण्यास सुरुवात केली आहे. आत्तापर्यंत वऱ्हाडींपैकी १६ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, जिल्ह्यात कोरोना निर्बंधांचे उल्लंघन केले जात असल्याने बाधितांचा आकडा वाढत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील लग्न सोहळ्यातही हाच प्रकार घडल्याचे निदर्शनास येत आहे. याची दखल घेऊन प्रशासन आता काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.