नवी मुंबई – येथील खार स्थानकावर एका २१ वर्षीय तरुणीला एका तरुणानं रेल्वेखाली ढकलण्याचा प्रयत्न केला. लग्नास नकार दिल्यानं तरुणानं हे कृत्य केल्याचं समोर आलं आहे. या घटनेत तरुणी बचावली असून, तिला दुखापत झाली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यानंतर फरारी झालेल्या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या वडाळ्यात राहणारा सुमेध जाधव आणि खार परिसरात राहणारी तरुणी एकाच ठिकाणी काम करत होते. ते दोन वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. कामाच्या ठिकाणीच सुमेधचं तरुणीवर प्रेम जडलं. त्याला तिच्याशी लग्न करायचं होतं. परंतु सुमेधला दारूचं व्यसन होतं, त्यामुळे तरुणीनं त्याला लग्नास नकार दिला. तरीही सुमेधनं तिचा पाठलाग सोडला नाही.
सुमेधच्या त्रासाला कंटाळून तरुणीच्या कुटुंबीयांनी निर्मलनगर पोलिस ठाण्यात तक्रारही नोंदवली होती. त्यानंतर सुमेध काही दिवस शांत होता. मात्र नंतर त्यानं पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली.
खार स्थानकावर शुक्रवारी तरुणी आल्यानंतर सुमेधनं तिला लग्नासाठी विचारणा केली. तरुणीनं पुन्हा नकार दिला. चालत्या रेल्वेतून उतरून तरुणीकडे गेला आणि तिला चालत्या रेल्वेखाली ढकलण्याचा प्रयत्न केला. तरुणी वाचली असून, तिच्या डोक्याला बारा टाके पडले आहेत. घटनेनंतर सुमेध तिथून पळून गेला. पोलिसांनी त्वरित तपास करत सुमेधला अटक केली.