नाशिक – लग्नाचे आमीष दाखवून बलात्कार करणाऱ्यास न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजूरी व १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. शैलेंद्र अरुण कुलकर्णी (३९, रा. स्नेहनगर, दिंडोरी रोड) असे आरोपीचे नाव आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार जानेवारी २०१३ ते ऑगस्ट २०१५ या कालावधीत म्हसरुळ परिसरात आरोपी शैलेंद्रने वारंवार अत्याचार केले. लग्नाचे आमीष दाखवून शैलेंद्रने शारिरीक संबंध केले. मात्र लग्नास नकार दिला. त्यामुळे पंचवटी पोलीस ठाण्यात शैलेंद्र विरोधात २४ ऑगस्ट २०१५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक व्ही. डी. पुंगळे यांनी करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील आर. एम. कोतवाल यांनी युक्तीवाद केला. यात साक्ष, पंच व परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. नायर यांनी शैलेंद्रला सक्तमजूरी व दंड ठोठावला आहे. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार एम. एम. पिंगळे व पोलीस नाइक एस. एल. जगताप यांनी कामकाज पाहिले.