नवी दिल्ली – देशभरात १ नोव्हेंबरपासून शासकीय तसेच खासगी बँकिंग क्षेत्रात मोठे बदल झाले आहेत. बँकांच्या व्यवहारासंबंधी हे बदल असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी गॅस सिलेंडर संदर्भात नवे धोरण तयार करण्यात आले होते, त्या अनुषंगाने अंलबजावणी सुरु असून आता बँकिंग क्षेत्रातले बदल ग्राहकांसाठी महत्वाचे ठरणार आहे. यासंबंधी स्टेट बंद ऑफ इंडिया, डिजिटल पेमेंट आणि बँकाच्या कामकाजाच्या वेळांत बदल होण्यासंबंधी निर्णय घेण्यात आले आहे.
बँकांच्या वेळात बदल
नोव्हेंबरपासून बँकांच्या वेळेत बदल होणार आहे. महाराष्ट्रात देखील हे नियम लागू होणार आहे. आता राज्यातील सर्व बँका एकाच वेळी उघडल्या आणि बंद होतील. सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत बँकेचे व्यवहार करता येणार आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँकांना हा नियम लागू होईल. अलीकडेच अर्थ मंत्रालयाने देशातील बँकांचा कामकाजाचा वेळ समान करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर हा नियम लागू केला जात आहे.
एसबीआयच्या व्याजदरात घट
स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात (एसबीआय)च्या ग्राहकांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. देशातील सर्वात मोठ्या बँकेने १ नोव्हेंबरपासून बचत खात्यात म्हणजेच बचत खात्यांवरील व्याज दरात बदल केले आहेत. १ नोव्हेंबरपासून बचत खात्यावर १ लाख रुपयांपर्यंत जमा झालेले व्याजदर ०.२५ टक्क्यांनी कमी करून ३.२५ टक्के करण्यात आले आहे. त्याचबरोबर १ लाख रुपयांपेक्षा जास्त ठेवीवरील व्याज रेपो दरानुसार उपलब्ध होईल असे एसबीआयने स्पष्ट केले आहे.
डिजिटल पेमेंट आता विनाशुल्क
१ नोव्हेंबरपासून डिजिटल पेमेंटसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. पन्नास कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांना डिजिटल पेमेंट अनिवार्य असणार आहे. नोव्हेंबरपासून आरबीआयचा हा नियमही लागू होणार आहे. नवीन व्यवस्थेनुसार ग्राहकांना किंवा व्यापार्यांना डिजिटल पेमेंटसाठी कोणतेही शुल्क किंवा व्यापारी सूट दर (एमडीआर) आकारला जाणार नाही. हे बदललेले नियम केवळ ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या व्यावसायिकांना लागू होतील.