मुंबई – हल्ली धावत्या कारने पेट घेतल्याच्या बातम्या आपण ऐकत व पाहत असतो. अशा घटनांमध्ये अनेकांचे जीवही गेले आहेत. मात्र असेही नाही की अशा घटना टाळणे शक्य नाही. आपण त्यावरील उपाय आणि पर्याय जाणून घेऊया…
कार चालविण्यापूर्वी – कार चालविण्यापूर्वी किंवा टॅक्सीमध्ये बसण्यापूर्वी विशिष्ट्य प्रकारचा वास तर येत नाही, याची खात्री करून घ्या. हल्ली सीएनजीचा वापर कारमध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे. अशा गाड्यांमध्ये आग लागण्याचा धोका वाढतो. त्यामुळे कारमध्ये बसण्यापूर्वी गॅस, पेट्रोलचा वास किंवा एखादी वस्तू जळल्याचा वास येत असेल तर गाडीत बसणे टाळावे.
कार चालविताना – धावत्या कारमध्ये असा कुठला वास येत असेल तर तातडीने गाडीचे इंजिन बंद करावे आणि खिडकीच्या काचा उघडाव्या. त्यानंतर लवकरात लवकर योग्य जागा बघून गाडी थांबवावी आणि बाहेर पडावे. बरेच लोक गाडीत अग्निशामक यंत्रणा ठेवत नाहीत. ही यंत्रणा आगीपासून संरक्षण करण्यासाठी आहे.
आग लागल्यास – कारच्या पुढच्या किंवा मागच्या भागाला आग लागण्याची शक्यता आहे. कारच्या इंजिनमधून धूर निघत असेल तर तातडीने इंजिन बंद करून बाहेर पडावे आणि अग्निशमन यंत्रणेचा वापर करावा. मात्र जर कारच्या मागच्या भागातून धूर निघत असेल किंवा आग लागली असेल तर आहे त्या जागेवर कार थांबवून तातडीने बाहेर पडावे.
आगीची कारणे – कारमध्ये आग लागण्याचे सर्वांत मोठे कारण म्हणजे शॉर्ट सर्किट आहे. जर उंदरांनी वायरिंग कापले असेल तर शॉर्ट सर्किटने आग लागू शकते. याशिवाय ओव्हर हीट झाल्यास शॉर्ट सर्किट होऊ शकते आणि कारमध्ये आग लागू शकते. पाईपमध्ये लीकेज, खराब वायरिंग, खराब रेडिएटर किंवा खराब बॅटरीनेही आग लागू शकते. वायरिंग खराब असणे हेच बहुतांश घटनांचे मुख्य कारण नोंदविण्यात आले आहे.