नवी दिल्ली – आपल्या कुटूंबापासून दूर असलेल्या आणि अन्य शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांना निवडणुकीत मतदान करण्यासाठी यापुढे घरी गावाकडे जाण्याची आवश्यकता राहणार नाही. कारण मतदार कोणत्याही मतदान केंद्रावर जाऊन त्याचा मताधिकार वापरू शकेल याकरिता निवडणूक आयोग एक योजना तयार करत आहे.
या संदर्भात माहिती देताना मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा म्हणाले की, निवडणूक आयोग देशातील कोणत्याही मतदान केंद्रावर जाऊन मतदान करता येईल अशी योजना सुरू करण्याचे काम करीत आहे. या रिमोट मतदान प्रकल्पावर रंगीत तालीम (मॉक ट्रायल) देखील लवकरच सुरू होईल. अरोरा पुढे म्हणाले, की, आम्ही आयआयटी मद्रास आणि इतर संस्थांच्या सहकार्याने दूरस्थ मतदान प्रकल्पांवर संशोधन सुरू केले असून यात आम्ही पुढे जात आहोत.
प्रत्येक निवडणुकीत असे हजारो मतदार असे आहेत की, जे भौगोलिक अडचणीमुळे मतदानाचा हक्क बजावू शकत नाहीत. नोकरी, शिक्षण, अभ्यास, आजारपण, आरोग्य उपचार, किंवा इतर कोणत्याही कारणांमुळे मतदार मतदार यादीमध्ये त्यांचे नाव असलेल्या स्थानापासून ते मतदार दूर राहतात. दूरस्थ मतदान प्रकल्प अशा मतदारांना आपल्या मतदारसंघांपासून दूर राहून देखील मतदानाचा हक्क बजावता येईल. तसेच परदेशी मतदारांसाठी पोस्टल बॅलेट सुविधा सुरू करण्याचा विचारही निवडणूक आयोग विचार करीत आहे.