नवी दिल्ली – ब्रिटनमधील नव्या कोरोना विषाणूच्या प्रकाराने संपूर्ण जग चिंतेत आहे. त्यामुळेच ब्रिटनहून येणारी विमानसेवा रद्द करण्यात आली आहे. मात्र, लंडनहून सोमवारी रात्री भारतात दाखल झालेल्या ९ प्रवाशांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या प्रवाशांना आता १४ दिवस विलगीकरणात रहावे लागणार आहे.
नवी दिल्लीत ५, कोलकात्यात २, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये प्रत्येकी १ प्रवासी कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे सर्व जण लंडनहून आले आहेत. तर, मुंबईत आलेल्या प्रवाशांच्या आरटी पीसीआर चाचणीचे अहवाल अद्याप आले नसल्याचे सांगितले जात आहे. दिल्लीत आलेल्या प्रवाशांना सरदार वल्लभभाई पटेल कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
गेल्या आठवड्यात ब्रिटनहून दिल्लीत आलेल्या सर्व प्रवाशांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे. त्यामुळे जवळपास ७ हजार प्रवाशांची कोरोना चाचणी होण्याची शक्यता आहे.