वॉशिंग्टन/लंडन – ब्रिटनवर नव्या कोरोना विषाणूचा प्रचंड कहर सुरु असून गेल्या २४ तासात शुक्रवारी देशभरात १३२५ जणांचा मृत्यू झाला आहे. या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून एका दिवसांतील मृतांची सर्वात मोठी संख्या आहे. यावर तातडीची उपाययोजना म्हणून सरकारने आणीबाणी लागू केली आहे.
लंडनमध्ये कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत परदेशातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांची नोंद केली आहे, त्यामुळे कोरोना संसर्गाची प्रकरणे काही प्रमाणात आटोक्यात आणली गेली आहेत. तसेच हा धोका लक्षात घेता ब्रिटनने कोविड -१९ चा तपासणी अहवाल भारतासह जगातील सर्व देशातील लोकांसाठी अनिवार्य केला आहे.
लंडनमधील रुग्ण संख्येत २७ टक्क्यांनी वाढ
लंडनमधील कोरोनाच्या नवीन विषाणूचे मोठ्या संख्येने संक्रमण होत आहे. लंडनचे महापौर सादिक खान यांनी याचे ‘मोठी दुर्दैवी घटना’ असे वर्णन केले. कारण लंडनमध्ये राहणारा प्रत्येक ३०वा व्यक्ती हा कोरोना पॉझिटिव्ह आहे. लंडनमध्ये आता संक्रमित झालेल्यांची संख्या ही एक लाख लोकांमागे एक हजाराहून अधिक आहे. दि ३०डिसेंबर २०२०ते दि. ६ जानेवारी २०२१ दरम्यान राजधानीत रुग्णालयातील एकूण रुग्णांची संख्या २७ टक्क्यांनी वाढली आहे.
कोविडची चाचणी ७२ तास आधी :
ब्रिटनमध्ये जाण्यापूर्वी लोकांना आता कोविड -१९चा निगेटिव्ह तपास अहवाल ७२ तास आधी दाखवावा लागेल. कोरोना प्रादुर्भावचा नवीन प्रकार रोखण्यासाठी उपाययोजनांचा भाग म्हणून ब्रिटनने ही घोषणा केली.
दंड आकारला जाईल:
प्रवाश्यांनी नवीन नियमांचे पालन केले नाही किंवा ब्रिटनला जाण्यापूर्वी तपासणी न केल्यास त्यांना दंडही आकारला जाईल. कोरोना चाचणी अहवालाशिवाय प्रवाशांना ब्रिटनमध्ये येण्याची परवानगी दिली जाणार नाही. ब्रिटीश परिवहन मंत्री ग्रँट शॅप्स म्हणाले की, कोरोना रोखण्यासाठी आम्ही यापूर्वी अनेक पावले उचलली आहेत, परंतु आपल्याला आता अतिरिक्त खबरदारी घ्यावी लागेल.
जपानने केली आपत्कालीन घोषणा
जपानने देखील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आपत्कालीन स्थिती जाहीर केली आहे. पंतप्रधान योशीहिडे सुगा यांनी लोकांना रेस्टॉरंट्समधील कामाचे तास कमी करण्यास सांगितले आणि लोकांना वर्क वरून होमचे पालन करण्याचे आवाहन केले. तसेच आपत्कालीन परिस्थिती ही दि. ७ फेब्रुवारीपर्यंत राहणार आहे.
ब्रिटनमध्ये एका दिवसात ११६२ मृत्यू
ब्रिटनमध्ये गुरुवारी गेल्या २४ तासात कोरोना संक्रमणामुळे ११६२ लोकांचा मृत्यू झाला, तर ५२,६१८ नवीन रुग्णांची नोंद झाली. ब्रिटनमध्ये १ हजार हून अधिक मृत्यूची नोंद सलग दुसर्या दिवशी झाली आहे. त्याचवेळी जपानमध्ये शुक्रवारी मागील २४ तासांत कोरोनाचे ७५oo हून अधिक नवीन रुग्ण आढळले.
अमेरिकेत दिवसाला चार हजार मृत्यू
अमेरिकेत गुरुवारी २४ तासांत कोविड संसर्गामुळे चार हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. एकाच दिवसात इतक्या मोठ्या संख्येने लोकांचा बळी गेल्याची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान, यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनचा अंदाज आहे की, जानेवारीअखेरीस मृतांची संख्या चार लाख पाच हजार ते चार लाख तीस आठ हजार दरम्यान असेल. ब्राझिलमध्ये गेल्या चोवीस तासात १५२४ लोकांचा मृत्यू झाला असून कोरोनामधील मृतांची संख्या दोन लाखांवर गेली आहे.
चीनमध्ये दोन शहरे सील
चीनमध्ये पाच महिन्यांत सर्वाधिक नवीन प्रकरणे आढळून आली आहेत, त्यानंतर दक्षिणी बीजिंगमधील शिजिया जुआंग आणि शिंगताई या दोन शहरांवर मोठे सावट झाले आहे. चीनमध्ये ५३ नवीन प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. यापैकी ३३ लोक हेबेईचे आहेत. रशियामध्येही कोरोना संसर्ग नियंत्रित होत नाही. रशियामध्ये गेल्या २४ तासांत २३,६५२ लोक संसर्गित झाले आहेत. त्याच्या आदल्या दिवशी ही संख्या २३,४६१ होती.