नाशिक : रोटरी क्लब ऑफ नाशिक आणि रिंग प्लस अॅक्वा लि. (रेमंडस ग्रुप) यांच्या संयुक्त विद्यमाने, जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता (ICU) विभागास डिजिटल एक्स-रे मशीन प्रदान करण्यात आले. यामुळे जिल्हातील शेकडो रुग्णांना अत्याधुनिक यंत्राद्वारे एक्स-रे काढता येणार आहे.
नाशिक जिल्हा रुग्णालयात जवळपास ७०० हून अधिक रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. सद्यपरिस्थितीत रुग्णांना एक्स-रे मशीनची नितांत गरज होती. केवळ नाशिकच नव्हे तर जिल्ह्यातील रुग्णांची ही गरज लक्षात घेवून रोटरी क्लब ऑफ नाशिकने सामाजिक भावनेतून एक्स-रे मशीन पुरविण्याचा निर्णय घेत रेमंडस ग्रुपच्या रिंग प्लस अॅक्वा लि. यांनी यासाठी सीएसआरच्या अंतर्गत तातडीने आर्थिक मदत देऊ केली.
रिंग प्लस अॅक्वाचे सीईओ व्ही. बालसुब्रमण्यन यांच्या हस्ते डिजिटल एक्स-रे मशीन प्रदान करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या अध्यक्षा मुग्धा लेले, सचिव विजय दिनानी, डॉ. श्रिया कुलकर्णी, मंगेश अपशंकर, ओमप्रकाश रावत, रिंग प्लस अॅक्वाचे प्लॅन्ट हेड कमलाकर टाक, सीएफओ सितेश माहेश्वरी आणि जिल्हा रुग्णालयाचे अधिकारी डॉ. बाबूलाल अग्रवाल या मान्यवरांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला. रोटरीचे सचिव तथा सीएसआर संचालक प्रफुल बरडिया यांनी यासाठी सर्वांचे आभार व्यक्त केले आहे. काही महिन्यांपूर्वीच नवजात शिशुसाठी चार सी-पेप मशीन व पोर्टेबल एक्स-रे मशीन रोटरी क्लब ऑफ नाशिकतर्फे प्रदान करण्यात आले होते. नाशिकचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी रोटरीच्या या उपक्रमाचे कौतुक करून समाधान व्यक्त केले. याशिवाय या दोन्ही संस्थांच्या वतीने लवकरच सिन्नर व इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यावर सोलर दिवे लावण्याचा एक मोठा उपक्रमही राबविण्यात येणार आहे.