नाशिक – नाशिक जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान देऊन उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा शुक्रवार (दि. २५) रोजी सायंकाळी सव्वापाच वाजता रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या वतीने शिक्षक गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. या कार्यक्रमास शब्दांचे किमयागार, जगाच्या कॅनव्हासवर मुसाफिरी करणारे ख्यातनाम लेखक अच्युत गोडबोले यांची उपस्थिती लाभणार असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा झूम आणि फेसबुकच्या माध्यमातून संपन्न होणार आहे.
रोटरी क्लब ऑफ नाशिक ही संस्था गेल्या सुमारे ७५ वर्षांपासून नाशिक शहर आणि जिल्ह्यात सातत्याने विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रम राबवित आहे. विशेषतः शिक्षण, आरोग्य, साहित्य, तंत्रज्ञान, कला अशा विविध क्षेत्रांत मुलांना निरनिराळी कौशल्ये विकसित कशा प्रकारे करता येतील यावर प्राधान्याने भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिक्षक गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रात जिल्ह्यातील विविध भागात विशेष ज्ञानदानाचे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शाळांतील तसेच महानगरपालिकेच्या शाळांतील एकूण १२ शिक्षकांना लेखक अच्युत गोडबोले यांच्या हस्ते शिक्षक गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे. प्रारंभी या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने अच्युत गोडबोले प्रथमच ‘माझ्या लिखाणातील धमाल गमती-जमती’ यावर रसिकांशी संवाद साधणार आहेत.
यंदाचा पुरस्कार सोहळा झूम प्लॅटफॉर्मवर साजरा होणार असल्याने या कार्यक्रमाचा आस्वाद जास्तीत जास्त नाशिककरांना घेता यावा यासाठी मिटिंग आयडी ५३२५५३४८३८ तसेच पासवर्ड आरसीएन टाकून सहभागी व्हावे असे आवाहन रोटरी क्लबच्या अध्यक्षा मुग्धा लेले, सचिव विजय दिनानी, प्रफुल बरडीया, निलेश सोनजे, हेमंत मराठे, मंथ लिडर सुचेता महादेवकर, ऋषिकेश सम्मनवार यांनी केले आहे.