नाशिक – लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून माध्यमांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांनी नेहमीच सामाजिक भान जोपासायला हवे. सोशल मिडीयाचे आव्हान उभे असताना, त्या माध्यमांवर येणारी माहिती ही विश्वासार्ह नसते. त्यामुळे आजही तसेच भविष्यातही मुद्रित माध्यमांचे स्थान व विश्वासार्हता कायम टिकून राहील. रोटरी क्लबच्या सामाजिक उपक्रमांना माध्यमांकडून नेहमी प्रसिद्धी मिळत असते. सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून होत असलेल्या सकारात्मक बातम्यांमुळे अनेकांना प्रेरणा मिळत असते, असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या अध्यक्षा मुग्धा लेले यांनी केले. रोटरी क्लबतर्फे दर्पण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर क्लबचे प्रकल्प सचिव विजय दिनानी, प्रशासन सचिव प्रफुल बरडिया आणि जनसंपर्क संचालक संतोष साबळे उपस्थित होते. यावेळी रोटरीच्या अध्यक्षा मुग्धा लेले यांच्या हस्ते पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध माध्यमांच्या संपादक व पत्रकारांचा बाळशास्त्री जांभेकर दर्पण पुरस्कार २०२१ देवून सन्मान करण्यात आला. सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.
प्रास्ताविकात जनसंपर्क संचालक संतोष साबळे यांनी प्रसारमाध्यमांत काम करताना सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांबाबत असलेली पत्रकारांची सहानुभूती वाखाणण्याजोगी असल्याचे सांगितले. यामुळे समाजभान जपणाऱ्या संस्थांना मोठे बळ मिळते असे ते म्हणाले. यावेळी भावेश ब्राह्मणकर आणि सतीश डोंगरे यांनी पत्रकारांच्या वतीने मनोगत व्यक्त करून रोटरीच्या उपक्रमांचे कौतुक केले. सूत्रसंचालन हेमंत मराठे यांनी केले तर प्रफुल बरडिया आभार यांनी मानले.
यांचा झाला सन्मान
इंडिया दर्पणचे कार्यकारी संपादक भावेश ब्राह्मणकर यांच्यासह गणेश डेमसे दैनिक (दिव्य मराठी), अनिकेत साठे (लोकसत्ता), जितेंद्र तरटे (महाराष्ट्र टाइम्स), सतीश डोंगरे (पुढारी), धनंजय रीसोडकर (लोकमत), अरुण मलाणी (सकाळ), , मुकुंद पिंगळे (अॅग्रोवन), किरण कवडे (आपले महानगर), मनीष कटारिया, प्रज्ञा सदावर्ते (सामना), सोमनाथ कोठुळे (भास्कर हिंदी), हितेश शहा (भ्रमर), गोविंद भोसले (पीटीआय), लियाकत पठाण (गावकरी).