नाशिक – विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या रोटरी क्लब ऑफ नाशिकतर्फे मंगळवारी (दि. २०) संध्याकाळी पाच वाजता निती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सुप्रसिद्ध अर्थतज्ञ डॉ. राजीव कुमार यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
डॉ. राजीव कुमार हे शाश्वत विकासाकडे भारताची वाटचाल, पुढील पाच वर्षात भारतात काय बदल बघायला मिळतील, कशा पद्धतीने विकासाच्या योजना राबविण्यात येतील याविषयी ते संवाद साधणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे व्याख्यान झूम आणि फेसबुकच्या माध्यमातून ऑनलाईन होणार असून सर्वांसाठी खुले असणार आहे.
डॉ. राजीव कुमार हे एक प्रख्यात अर्थतज्ज्ञ असून त्यांची भारतीय अर्थव्यवस्था, स्थानिक व राष्ट्रीय सुरक्षा याविषयी अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकोनॉमिक्स अँड पॉलिटिक्स’ चे ते कुलपती असून ‘पहले इंडिया फाउंडेशन’ चे संस्थापक व संचालक आहेत. रिझर्व बँक ऑफ इंडियाचे इंडिपेंडंट डायरेक्टर तसेच इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट दिल्लीचे डायरेक्टर असून त्यांनी आजवर अनेक संस्थांमध्ये संचालक, सल्लागार म्हणून उच्च पदे भूषविलेली आहेत.
नाशिक रोटरी एन्क्लेव या उपक्रमामध्ये सहभागी असून नाशिकमधील सर्व रोटरी क्लबचा या आयोजनात समावेश आहे. या व्याख्यानाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या अध्यक्षा मुग्धा लेले, सचिव विजय दिनानी, प्रफुल बरडिया, हेमंत मराठे, मंथ लीडर नितीन ब्रह्म, सुजाता राजेबहादुर आदींनी यांनी केले आहे.