नाशिक – जागतिक मृदा दिनानिमित्याने रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या वतीने ओम गायत्री नर्सेरीच्या उगाव (ता. निफाड) येथे ‘रोटरी कृषिमंथन’ कार्यक्रम घेण्यात आला. दर्जेदार पिक उत्पादनासाठी जमिनीचे आरोग्य व अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयावर अॅग्रीसर्च इंडियाचे मृदा शास्त्रज्ञ डॉ. ओमप्रकाश हिरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कृषिमंथन उपक्रमाद्वारे ‘कॄषि विकास हाच रोटरीचा ध्यास’ अंतर्गत शेतकरी, महिला बचतगट व ग्रामीण युवकांना वर्षभर विविध विषयांवर प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्याचा प्रकल्प सुरु करण्यात आला आहे.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते माती पूजन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. रासायनिक खतांच्या असमतोल वापरामुळे जमीनीतिल जैविक विविधतेवर परिणाम होऊन जमीनीचे आरोग्य बिघड़त आहे. याचा परिणाम पिक उत्पादन व दर्जा यावर होत आहे. शेतकऱ्यांना अधिकचा खर्च करून उत्पादन कमी होत आहे. शेतकऱ्यांनी माती परीक्षणानुसार पिकाला अन्न द्रव्याचा पुरवठा करावा तसेच सेंद्रिय व जैविक खतांचा वापर वाढवावा असे आवाहन डॉ. हिरे यांनी यावेळी केले. तसेच मातीचे आरोग्य जपण्यासाठी शपथ दिली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ओम गायत्री फार्मर प्रोड्यूसर कंपनी आणि एचडीएफसी बँक यांचे सहकार्य लाभले. यावेळी मधुकर गवळी व चैतन्य डबीर यांनीही मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व रोटरी कृषिमंथन उपक्रमाचा उद्देश अॅग्री सर्चचे मार्केटिंग संचालक पंडित खांदवे यांनी स्पष्ट केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कम्युनिटी सर्व्हिस संचालक हेमराज राजपूत, राज यादव, राजेंद्र गवळी यांनी विशेष परिश्रम घेतले. रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या अध्यक्षा मुग्धा लेले, सेक्रेटरी विजय दिनानी, प्रफुल बरडिया यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रोटरी कृषि मंथनचे चेअरमन तुषार उगले यांनी केले. शाम देशपांडे यांनी आभार मानले.