नाशिक : रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या वतीने नाशिककरांसाठी आयोजित केलेल्या ऑरगॅनिक भाजीपाला, फळे, रानभाज्या, कडधान्ये बाजारास नाशिककर नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. स्वच्छ, ताजा भाजीपाला माफक दरात उपलब्ध झाल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे यावेळी सुरगाण्याच्या मातीतील स्ट्रॉबेरीची चव चाखण्यासाठी संधी नाशिककरांना मिळाली.
नाशिककरांना शेतकऱ्यांचा ऑरगॅनिक पद्धतीने उत्पादित स्वच्छ, ताज्या पालेभाज्या, फळे, कमीतकमी हाताळणी करून ग्राहकांना उपलब्ध देण्यात आला होता. जैविक घटकांचा वापर करून हानिकारक रसायन विरहीत उत्पादित व प्रमाणित केलेल्या मालास ग्राहकांनी चांगली पसंती दिली.
कोरोणाच्या पार्श्वभूमीवर मास्क, सुरक्षित अंतर आणि हात धुवूनच प्रवेश दिला. ग्रामीण भागातील शेतकरी महिला बचतगटांनी तयार केलेली घरगुती पद्धतीचे मसाले, सुकविलेल्या भाज्या, लाकडी घाण्याचे शेंग, खोबरे, बदाम, तीळ, मोहरी, करडई, सूर्यफुल खुरासणी, सूर्यफुल, एरंडतेले, हातसडी तांदूळ, सेंद्रिय गुळ या उत्पादनांनादेखील चांगली मागणी होती. अवघ्या तीन तासात शेकडो नाशिककरांनी रोटरी बाजारला भेट देत खरेदीचा आनंद लुटला.
स्ट्रॉबेरीला दिली पसंती
सुरगाणा तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांनी आणलेल्या स्ट्रॉबेरीची अवघ्या दोन तासात विक्री झाली. सुरगाण्याच्या मातीत बहरलेली ताजी स्ट्रॉबेरी नाशिककरांना उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
नागरिकांकडून समाधान
भाजीपला स्वच्छ, ताजा आणि माफक दरात उपलब्ध झाल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लबचे अध्यक्ष मुग्धा लेले, सचिव विजय दिनानी, प्रफुल बरडिया, कम्युनिटी सर्व्हिस संचालक हेमराज राजपूत, जनसंपर्क संचालक संतोष साबळे आणि रोटरी बाजार समन्वयक रफिक व्होरा, तुषार उगले तसेच सुधीर वाघ आदी प्रयत्नशील आहेत.