- अत्यावस्थ बालकांसाठी अतीदक्षता विभाग सुरु केल्याने नाशिकच्या वैद्यकीय क्षेत्रात भर पडेल – जिल्हाधिकारी सूरज मांढरे
नाशिक : कोविड काळात नाशिक जिल्ह्यातील सामाजिक संस्थांनीही जनजागृती केल्यामुळे जिल्ह्याचा कोविड आणि मृत्युदर देशाच्या तुलनेत कमी आहे याचे समाधान वाटते. गरजू, होतकरू मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या माध्यमातून नवीन आरोग्य उपचार यंत्रणा उभी केल्याने नाशिकच्या वैद्यकीय क्षेत्रात निश्चितच भर पडेल, असा विश्वास जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी व्यक्त केला. सामाजिक जाणीव ठेवून आरोग्य क्षेत्रात मोठे योगदान देणाऱ्या रोटरीच्या सामाजिक उपक्रमांचेही त्यांनी कौतुक केले.
येथील नेल्सन हॉस्पिटलमध्ये रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या माध्यमातून रुपये ५० लाख खर्च करून गरीब लहान मुलांसाठी निओ नॅटल अतीदक्षता विभागाचे आज जिल्हाधिकारी सूरज मांढरे आणि रोटरीचे प्रांतपाल शब्बीर शाकिर यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. गंभीर आजारासाठी आवश्यक असलेली उपचार यंत्रणा आपल्या नाशिकमध्ये उपलब्ध नसल्यामुळे, नागरिकांना रुग्ण मुंबई-पुण्याला हलवावी लागतात. आधीच सिरीयस असलेली ही बालके, या प्रवासा दरम्यान अधिक अत्यावस्थ होतात. परिणामी अनेकांना प्राणही गमवावा लागतो. अशा परिस्थितीत रोटरीच्या पुढाकाराने सुरु केलेल्या या उपक्रमामुळे बालकांना जीवदान मिळणार आहे. नाशिकमधील बाल आरोग्यसेवेतील ही कमतरता लक्षात घेऊन नेल्सन हॉस्पिटलमध्ये ‘हाय फ्रिक्वेन्सी व्हेंटिलेटर’, ‘ई.टी.ओ. स्टेरीलायझर’, ‘सिरिंज पंप्स’, ‘मल्टीप्यारा मॉनिटर्स’ यासारखे अत्याधुनिक उपकरणे नुकतीच उपलब्ध केली आहेत. या नवीन उपचार यंत्रणेमुळे यापुढे डेंग्यू, कोविड तसेच इतर आजारांमध्ये उद्भवणाऱ्या निरनिराळ्या कॉम्प्लिकेशन्सवर, उपचार घेण्यासाठी मुंबई-पुण्याला जाण्याची गरज पडणार नाही. अशा पेशंटचा इलाज नाशिकमध्ये राहूनच करता येणार आहे.
रोटरीचे प्रांतपाल शब्बीर शाकिर यांनी रोटरीच्या माध्यमातून होत असलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांची प्रशंसा केली. प्रारंभी रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या अध्यक्षा मुग्धा लेले यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक करीत, रेडीओ आरोग्यमंथन, आदिवासी बंधूसाठी आर्थिक सहयोग देणारी मायक्रो क्रेडिट, युवा करिअर मंथन, कृषी मंथन, ओरगॅनिक बाजार अशा अनेक समाजोपयोगी उपक्रमांची माहिती दिली. नेल्सन हॉस्पिटलचे डॉ. मंदार वैद्य यांनी प्रकल्पाची माहिती करून दिली. रोटरीचे माजी प्रांतपाल राजीव शर्मा, महेश मोकळकर, उदय पटवर्धन, रवि महादेवकर यांनीही यावेळी आपले विचार मांडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्रिया कुलकर्णी आणि मंगेश अपशंकर यांनी केले. सचिव प्रफुल बरडीया यांनी उपस्थितांचे आभार केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री विजय दिनानी, डॉ. प्रफुल पटेल, डॉ. रामनाथ जगताप आदींनी विशेष परिश्रम घेतले.