नाशिक – कोरोनाच्या संकटामुळे शैक्षणिक संस्थांमधून फक्त ऑनलाइन शिक्षण सुरु आहे. इतर सर्व शैक्षणिक उपक्रमही बंद आहेत. तसेच हे उपक्रम कधी सुरू होतील, याचीही स्पष्टता नाही. या परिस्थितीत शालेय विध्यार्थी वाहतूक करणाऱ्या खासगी स्कूल बस, व्हॅन चालक/मालक वर्गावर उपासमारीचे संकट ओढवले आहे. निम्न व मध्यम उत्पन्न गटातील या कष्टाळू वर्गापैकी मोठा वर्ग हा अल्प शिक्षित वा अशिक्षित असून टाळेबंदीमुळे गेल्या आठ महिन्यांपासून ही वाहने जागेवरच उभी आहेत. या वाहनांच्या देखभालीसाठीचा खर्च काढणेही या मध्यमवर्गीय वाहन चालकांना परवडत नसल्याचे चित्र आहे. विविध बँका व पत संस्थांच्यावतीने त्यांच्या थकीत कर्जावर व्याज व व्याजावर चक्रवृद्धी व्याज अश्या पठाणी वसुलीसाठी सातत्याने तकादा सुरु आहे. त्यामुळे स्कूल बस व व्हॅनचालक प्रचंड वैतागले आहेत.
राज ठाकरे यांना भेटणार
राज्य व केंद्र सरकारकडून कुठलीच दखल घेतली जात नसल्याने त्यांचा संयम संपत चालला आहे. म्हणूनच नाशिक शहर व जिल्हा खासगी मान्यताप्राप्त स्कुल बस, व्हॅन चालक / मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनसेचे शहराध्यक्ष अंकुश पवार यांची भेट घेतली. यावेळी वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष जावेद शेख, वाहतूक सेनेचे शहराध्यक्ष निलेश सहाणे, मयूर कुकडे, अमित सालीयन्स, विल्सन साळवी, संदेश आडके आदी उपस्थित होते. याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सर्व जण भेट घेणार आहेत. ही सर्व व्यथा त्यांच्याकडे मांडणार आहेत.