मनाली देवरे, नाशिक
….
दिल्ली कॅपीटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा ६ गडी राखून पराभव केला आणि प्ले–ऑफ फेरीतले दुसरे स्थान पक्के केले. परंतु, हा पराभव रॉयल चॅलेंजर्स साठी देखील आनंदाचा विषय ठरला कारण १९ व्या षटकात हा पराभव आल्यामुळे नेट रनरेटच्या आधारे हा संघ देखील प्ले ऑफ साठी क्वालिफाय ठरला. रॉयल चेलंजर्स साठी अशारितीने आजचा पराभव देखील रॉयल झाला.
कोविड–२०१९ वर मात करण्यासाठी भारताबाहेर खेळवल्या गेलेल्या आयपीएल–२०२० च्या साखळी सामन्यांचा प्रवास आता संपेल. हा प्रवास संपतांना ८ पैकी ४ संघ माघारी येतील तर ४ संघ पुढच्या प्रवासाला निघतील. पुढच्या प्रवासाचे नाव आहे “प्ले ऑफ” आणि हा एक खडतर प्रवास असून तो साखळी इतकाच रोमांचक ठरेल अशी शक्यता आहे. या प्रवासासाठी संघ पुढे घेवून जाणा–या बसमध्ये अवघे ४ बर्थ आहेत आणि त्यापैकी मुंबई इंडियन्सने एक बर्थ आधीच बुक करून ठेवला होता. आजच्या सामन्यात आणखी दोन बर्थ बुक झाल्याने आता उरली आहे ती अवघी एक जागा.
दिल्लीने मारली बाजी
आरसीबी विरूध्द दिल्ली संघादरम्यानच्या सामन्यात आरसीबीने दिल्लीला जिंकण्यासाठी १५२ धावांचे आव्हान दिले होते. देवदत्त पडीकलने या सिझनमध्ये ज्या काही सामन्यात धावा केल्या नाहीत ते सामने अगदीच बोटावर मोजण्याइतके कमी आहेत. तो आरसीबीसाठी या सामन्यातही देवासारखाच फलंदाजी करून गेला. ४१ चेंडूतील त्याच्या ५० धावा आणि त्यासोबत एबी डिव्हीलीयर्स (३५), विराट कोहली (२९) यांच्या फलंदाजीमुळे आरसीबीने १५२ धावांचे समाधानकारक आव्हान दिल्लीला दिले होते. परंतु, दिल्लीच्या फलंदाजीसमोर हे आव्हान अतिशय वाटले. शिखर धवनला या सिझनच्या शेवटी जो सुर गवसलाय तो लाजवाब आहे. त्याने दिल्ली संघासाठी या सामन्यात पुन्हा एकदा महत्वाचा डाव रचला. त्याने केलेल्या ५४ धावा आणि अंजिक्य रहाणेची ६० धावाची खेळी, यामुळे यंदा पहिल्या दोन नंबरवर रहाण्याचे जे स्वप्न दिल्लीने बघितले होते ते पुन्हा रूळावर आले.
मुंबई इंडीयन्स ठरवणार चवथा संघ
बुधवारी मुंबई विरूध्द होणा–या सामन्यात सनरायझर्सने विजय मिळवला तर कोलकात नाईट रायडर्स आणि सनरायझर्स यांच्यापैकी ज्यांचा रनरेट जास्त तो संघ प्ले–ऑफच्या बसमधील शेवटच्या म्हणजेच चवथ्या बर्थ वर जावून विराजमान होईल. परंतु, जर सनरायझर्स हैद्राबास संघ पराभूत झाला तर केकेआर साठी सरळ प्रवेश पध्दतीने प्ले ऑफची जागा निश्चीत होईल. थोडक्यात, आता यापुढची सगळी गणितं मुंबई इंडीयन्सच्या हातात आहे आणि त्यांच्या कामगिरी वर केकेआर की सनरायझर्स ॽ याप्रश्नाचे गणित सुटेल.