नवी दिल्ली – आयकर विभागाकडून होत असलेल्या चौकशीला सामोरे गेल्यानंतर प्रतिक्रिया देताना रॉबर्ट वड्रा म्हणाले की, राजकीय परिवाराशी संबंधित असल्याने मला त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळेच यांच्याशी लढण्यासाठी मला निवडणूक लढवून संसदेत जावेच लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे.
नवी दिल्लीतील सुखदेव विहार येथील आपल्या कार्यलयात आयएनएस वृत्तसंस्थेशी ते बोलत होते. मी अशा राजकीय परिवाराशी संबंधित आहे, ज्याच्या अनेक पिढ्यांनी देशसेवा केली आहे, तसेच देशासाठी प्राणही दिले आहेत. तरीही सध्या मला त्रास देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे प्रयत्न हाणून पाडायचे असतील तर मलाही निवडणूक लढवून संसदेत जायला हवे. मी राजकारणात नसल्याने मला त्रास दिला जात आहे.
जेंव्हा सरकारकडे कोणताही मुद्दा नसतो तेंव्हा मला पंचिंग बॅग म्हणून वापरले जाते. बेहिशेबी मालमत्तेचे आपल्यावर लावण्यात आलेले आरोप बिनबुडाचे आहेत. कोणत्याही गोष्टीवरून लोकांचे लक्ष उडवायचे असले की मग त्यांना माझी आठवण येते.
आजवर मी राजकारणापासून लांब राहिलो, कारण याबाबत माझे विचार वेगळे आहेत. पण, योग्य वेळ येताच मी याबाबत निर्णय घेईन. लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल आणता येईल, असेच क्षेत्र मी लोकसेवेसाठी निवडणार आहे. आणि या केलेल्या कामावरच मी लोकांकडून मते मागेन, असेही वाड्रा म्हणाले. याबाबत मी घरच्यांशी देखील चर्चा करेन. माझा पूर्ण परिवार विशेषतः प्रियांका नेहमीच माझ्यासोबत असते.