नाशिक – रेस्टॉरंट व्यवसायिक प्रचंड अडचणीत आल्याने रेस्टॉरंट व्यवसाय पूर्ववत सुरु करण्याची परवानगी द्यावी, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अग्रिकल्चरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी केली आहे.
रेस्टॉरंट क्लस्टरच्या शिष्टमंडळाने केलेल्या मागणीला चेंबरेन पाठिंबा दिला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देण्यात आले आहे.
नाशिक रेस्टॉरंट क्लस्टरचे संस्थापक वेदांशू पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंडलेचा यांची भेट घेतली. रेस्टॉरंट व्यवसाय सुरु करण्याबाबत त्यांनी चर्चा केली. चेंबरने सरकारकडे यासंदर्भात पाठपुरावा करावा, अशी मागणी केली. त्या पार्श्वभूमीवर चेंबरने क्लस्टरच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रेस्टॉरंट व्यवसाय सुरू करण्याच्या मागणीचे पत्रही देण्यात आले आहे.
गेल्या ५ महिन्यांपासून कोरोना लॉकडाऊन सुरु आहे. टप्प्याटप्प्याने व्यापार-उद्योग सुरु झाले आहेत. मात्र रेस्टॉरंट व्यवसाय अजूनही पूर्ण सुरु करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे रेस्टॉरंट व्यवसाय मोठ्या अडचणीत आहे. सरकारने पार्सल सेवा देण्यास परवानगी दिली असली तरी खर्च परवडत नसल्याने अनेक रेस्टॉरंट बंद झाले आहेत. अनेकांना रेस्टॉरंटचे भाडे देणेही शक्य होत नाही, कर्मचाऱ्यांचा पगार, दैनंदिन खर्च निघत नसल्याने रेस्टॉरंट व्यवसाय पूर्ववत सुरु करण्यास परवानगी मिळावी, अशी नाशिक रेस्टॉरंट क्लस्टरची मागणी आहे.
याप्रसंगी नाशिक रेस्टॉरंट कलस्टरचे स्वप्नील रोकडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस भूषण काळे, प्रशांत खैरे, अभिजित अहिरे, दिग्विजय मानकर, सुबोध झरे, हेमंत जाधव, निखिल पालवे, अभिजीत अहिरे, मदन पाठक, चेंबरचे सचिव चंद्रकांत दीक्षित, सहा. सचिव अविनाश पाठक उपस्थित होते.