कोलकाता – खुद्द आपल्या जन्मदात्या पित्यालाच मुलीने ठार मारल्याची भयानक, निर्दयी आणि दुर्देवी घटना कोलकाता शहरामध्ये घडली. एका २२ वर्षीय युवतीने आपल्या वडिलांना रेस्टॉरंटमध्ये नेऊन, खायला देऊन आणि दारू पाजून ठार मारल्याचा आरोप केला.
यासंबंधी माहिती देताना एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, ही युवती रविवारी रात्री वडिलांसोबत जेवण करण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये गेली होती आणि जिथे तिने आपल्या वडिलांना ( वय ५६ ) मद्य प्यायला लावले. त्यानंतर ते दोघे हुबळी नदीच्या काठी आले असता, काही वाद झाल्याने त्या मुलीने आपल्या वडीलांच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली असून तिच्या नातेवाईकाच्या तक्रारीवरून त्या मुलीला अटक करण्यात आली आहे. सदर मुलीनेही आपला गुन्हा कबूल केला आहे.
चौकशीदरम्यान या संशयीत आरोपी असलेल्या मुलीचा असा आरोप आहे की, तिची आई लहान असतानाच मरण पावली होती आणि त्यानंतर तिच्या वडिलांनी तिला त्रास देणे सुरू केले होते, परंतु तिच्या लग्नानंतर ती सासरी गेली. मात्र आता काही दिवसापुर्वी तीचे लग्न मोडल्यानंतर जेव्हा ती माहेरी घरी परत आली तेव्हा तिचा वडीलाकडून छळ पुन्हा सुरू झाला. आता पोलीस या घटनेची चौकशी करीत असून सदर महिलेला न्यायालयात हजर केले असता तिला २९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.