मुंबई : मौजे सोनेगाव, ता. जामखेड, जिल्हा अहमदनगर येथील स्वस्त धान्य दुकानातील तांदळाच्या अवैध व्यवहाराबाबत तसेच शेगाव तालुक्यातील बुलढाणा-अकोला सीमेवर ४१० कट्टे भरलेला तांदळाचा ट्रक पकडून जप्त करण्यात आला. या सर्व प्रकरणाची ‘सीआयडी’ मार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना करत राज्यातील नागरिकांना अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच काळा बाजार करणाऱ्यांवर विशेष पथकांच्या माध्यमातून लक्ष ठेवून कारवाईदेखील करण्यात येत आहे. राज्यातील एकही नागरिक अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही यासाठी राज्याच्या अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. तसेच या काळामध्ये अन्नधान्याचा काळाबाजर करणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या पथकातील पोलिसांनी जामखेड तालुक्यातील सोनेगाव येथून गुजरातला जाणारा स्वस्त धान्य दुकानातील २४ टन तांदूळ भरलेला ट्रक पकडला होता. या तांदळाच्या अवैध विक्री व्यवहाराची तसेच शेगाव तालुक्यातील बुलढाणा-अकोला सीमेवर ४१० कट्टे भरलेला तांदळाचा ट्रक पकडून जप्त करण्यात आला. या तांदळाच्या काळा बाजार व अवैध विक्री व्यवहाराची चौकशी सीआयडीमार्फत करण्यात येणार असून दोषींना कठोरात कठोर शिक्षा करण्यात येईल. त्यामुळे राज्यातील गैरव्यवहारांना आळा बसणार असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे.