नवी दिल्ली ः रेल्वे विभागानं मोफत वायफाय सुविधा देण्यासोबतच कमवण्याचा नवा पर्याय शोधला आहे. रेल्वे स्थानकांवर हायस्पीड वायफाय सुविधा वापरण्यासाठी तुम्हाला खिसा रिकामा करावा लागणार आहे. या सुविधेचा उपयोग करण्यासाठी कमीत कमी दहा रुपये वसूल केले जातील. रेल्वेनं ४ हजारांहून अधिक स्थानकांवर पेड वायफाय प्लॅन लॉन्च केलं आहे. अर्धा तासाची मोफत वायफाय सुविधा कायम असेल. अर्ध्या तासानंतर तुम्ही ५ जीबी डाटा वापरल्यास त्यासाठी दहा रुपये द्यावे लागतील.
रेल्वे स्थानकांवर अर्धा तासासाठी १ एमबीपीएसची वायफाय सुविधा मिळणार आहे. परंतु अर्ध्या तासानंतर प्रवाशांना इंटरनेट सुविधा वापरायची असेल तर त्यासाठी पैसे अदा करावे लागतील. त्यासाठी इंटरनेटची सुविधा देणार्या रेलटेलनं पेड प्लॅन लॉन्च केला आहे. रेलटेलचे सीएमडी पुनित चावला म्हणाले, स्थानकांवर हाय स्पीट इंटरनेट सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मोफत वायफायची सुविधा १ एमबीपीएस स्पीडनं प्रवाशांना दिली जाते. तर पेड वायफाय सुविधा ३४ एमबीपीएस स्पीडची असेल. पोस्टपेड प्लॅननुसार, ५ जीबी डाटा पॅकसाठी १० रुपये शुल्क वसूल केले जातील. १० जीबी डाटा वापरण्यासाठी प्रतिदिन १५ रुपये अदा करावे लागतील.
अशाप्रकारे तुम्ही १० जीबी डाटा पाच दिवसांत वापरू इच्छित असाल तर २० रुपये. २० जीबी डाटा पाच दिवसात वापर करत असाल, तर ३० रुपये. १० दिवसांमध्ये वापर करत असाल तर ४० रुपये अदा करावे लागतील. पोस्टपेड प्लॅनमध्ये एक महिन्याचा प्लॅनही प्रवासी घेऊ शकतात. या प्लॅननुसार, ६० जीबी डाटा पॅकसाठी ७० रुपये अदा करावे लागतील.
अर्धा तास वायफाय वापरल्यानंतर मोबाईलवर एक मॅसेज येईल. त्यानंतर गेट वे च्या माध्यमातून शुल्क अदा करण्याची सुविधा मिळेल. रेल्वेनं ७,९५० हून अधिक स्थानकांवर मोफत वायफाय सुविधा अर्धा तासासाठी दिली आहे. कोविडच्या आधी २.९ कोटी लोकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे.