अमृतसर- केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात रेल्वे रुळावर धरणे देणा-या शेतक-याच्या एका गटाने १६९ दिवसांनंतर गुरुवारी आपले आंदोलन मागे घेतले. रेल्वेसेवा ठप्प झाल्याने त्यांचे आणि व्यापा-यांचे नुकसान होत असल्यानं शेत-यांनी हा निर्णय घेतला.
किसान मजदूर संघर्ष समितीचे नेते साविंदर सिंग म्हणाले, की त्यांनी आंदोलन करणा-या सर्व शेतकरी संघटनांसोबत चर्चा करून अमृतसर-दिल्ली रेल्वे मार्ग देवीदासपुरा इथे रेल रोको मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. जंडियाला स्थानकाजवळ देवीदासपुरा, अमृतसर रेल्वे स्थानकापासून २५ किलोमीटर दूर आहे.
शेतकरी फक्त प्रवासी रेल्वेंना थांबवत होते. परंतु केंद्राने मालगाड्यांनासुद्धा थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शेतकरी, व्यापारी आणि उद्योगपतींचे मोठं नुकसान झाले. सध्याच्या परिस्थितीत शेतक-यांनी सर्वसंमतीने आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. आंदोलन मागे घेतल्यानंतर काही दिवसांत रेल्वेगाड्यांची वाहतूक पुन्हा सुरू केली जाईल, असे अधिका-यांनी सांगितलं.
केंद्राच्या तीन कृषी कायद्यांविरोधात अजूनही शेतक-यांचे आंदोलन सुरू आहे. या मुद्दयावर सरकार विरोधात शेतक-यांनी आरपारची लढाई लढण्याची तयारी केली आहे. शेतक-यांनी सरकारला लवकर मागण्या मान्य करण्याचे अपिल केले आहे. परंतु कृषी कायदे मागे घेणार नसल्याचे सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.