नवी दिल्ली – देशातील रेल्वेसेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहे. रेल्वेची संख्या कमी असल्यानं प्रवाशांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. या समस्येला दूर करण्यासाठी १० एप्रिलपर्यंत कोरोनाकाळापूर्वी धावणाऱ्या रेल्वेगाड्यांपैकी ९० टक्के गाड्या पुन्हा चालवण्यात येणार असून, त्याची तयारी सुरू झाली आहे. या निर्णयामुळे रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
उत्तर रेल्वे विभागाकडून संख्या वाढवण्याच्या सूचना
उत्तर रेल्वे विभागाकडून सर्व मंडळांना पत्र लिहून रेल्वेगाड्यांची संख्या वाढवण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यासंबंधित जारी एका पत्रामध्ये रेल्वे बोर्डाच्या निर्देशांचा हवाला देण्यात आला आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात रेल्वेसेवा बंद करण्यात आली होती.
जूनपासून विशेष धावताहेत रेल्वे
जूनपासून विशेष रेल्वे धावत आहेत. हळूहळू त्यांची संख्या वाढवली जात आहे. लांब पल्ल्याच्या रेल्वे सुरू झाल्यानंतर या महिन्यातच स्थानिक रेल्वेसेवा सुरू करण्यात येणार आहे. सध्या दिल्ली विभागात जवळपास ५० टक्के रेल्वेसेवा पूर्ववत झाली आहे.
कोरोना संकटाच्या आधी नवी दिल्लीतून ३६० रेल्वे सुरू होत्या. परंतु सध्या १७७ रेल्वे सुरू आहेत. इतर स्थानकांतूनही धावणाऱ्या रेल्वेची संख्या कमीच होती. मर्यादित रेल्वे धावत असल्यानं प्रवाशांना आरक्षित तिकीट मिळवण्यात अडचणी येत आहेत.