नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पात पुढील काही वर्षांत देशातील सर्व रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण करण्याचे लक्ष्य असल्याने भारतीय रेल्वे २०३० पर्यंत जगातील प्रथम प्रदूषण रहित रेल्वे विभाग बनणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिली.
रेल्वेच्या आगामी नियोजनासंबंधी माहिती देताना गोयल म्हणाले की, २०३० पर्यंत सर्व गाड्या डिझेलमुक्त होणार असून त्यामुळे दिल्लीसह संपूर्ण देशाला वायू प्रदूषणापासून दिलासा मिळणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार बनण्यापूर्वी दरवर्षी रेल्वे विकासासाठी सुमारे ४० हजार कोटींची गुंतवणूक केली जात असे. यावर्षी अर्थमंत्र्यांनी रेल्वेमध्ये २ लाख १५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे महामार्गाच्या विस्तारीकरणासाठी प्रचंड रक्कम खर्च केली जाणार आहे. रेल्वे आणि रस्ते गुंतवणूकीमुळे विकासाला वेग येईल.
गोयल पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात सध्या जमीन उपलब्ध नसल्यामुळे मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प लांबणीवर पडला आहे. गुजरातमधील ९० टक्के जमीन अधिग्रहित करण्यात आली असून तेथे काम करण्यासाठी निविदादेखील देण्यात आल्या आहेत. मात्र दुसरीकडे महाराष्ट्रात फक्त ३० टक्के जमीन अधिग्रहित करण्यात आली आहे. आगामी काळात देशातील अन्य सात मार्गांवर वेगवान गाड्या चालविण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. तसेच मनमोहनसिंग सरकारच्या काळात २० हजार मेगावॅट सौर उर्जा उत्पादन होते. आता एक लाख मेगावॅट उत्पादन होते. २०३० पर्यंत ४.३० लाख मेगावॅट उर्जा निर्मिती करण्याचे लक्ष्य आहे. यात रेल्वे देखील योगदान देईल आणि २०३० पर्यंत १०० टक्के नूतनीकरण योग्य रेल्वे चालवण्याचे लक्ष्य आहे.