नवी दिल्ली/मुंबई – भारतीय रेल्वे सतत नियमांमध्ये बदल करीत असते. प्रवासादरम्यान नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देतानाच विविध बाबींमध्येही आता बदल करण्यात आले आहेत. अलीकडेच शताब्दी एक्स्प्रेसमधील विविध घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रवाश्यांच्या सोयीसुविधांमध्येही कपात करण्यात आली आहे. यातच आता प्रवासी रात्री ११ ते पहाटे ५ या कालावधीत धावत्या ट्रेनमध्ये आपला मोबाईल चार्ज करू शकणार नाही, असा फतवा प्रशासनाने काढला आहे.
सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वेमध्ये आता सर्व चार्जिंग पॉईंट एकाचवेळी बंद करण्यात येतील. बहुतांश प्रवासी रात्री झोपताना आपला मोबाईल चार्जींगला लावून झोपी जातात. अश्यात ओव्हर चार्जिंगमुळे मोबाईल ब्लास्ट होण्याचा धोका असतो. त्याचवेळी मोबाईलच्या चोरीचीही भिती असते, असे रेल्वेचे म्हणणे आहे.
भारतीय रेल्वेने नव्या व्यवस्थेंतर्गत सर्व रेल्वे मंडळांना हे नियम लागू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पूर्व मध्य रेल्वे, हाजीपूरच्या अख्त्यारित संचालन असलेल्या सर्व स्पेशल एक्स्प्रेस गाड्यांमध्ये तात्काळ प्रभावाने हा नियम लागू करण्यात आला आहे.









