नवी दिल्ली ः रेल्वेच्या सर्व डब्यांना डिसेंबर २०२२ पर्यंत सर्व गाड्यांच्या डब्यांमध्ये आरएफआयडी टॅग बसविणार आहे. रेल्वे मंत्रालयाने तशी घोषणा केली आहे.
भारतीय रेल्वे डिसेंबर २०२२ पर्यंत सर्व डब्यांमध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (RFID) टैग बसवण्याची प्रक्रिया पूर्ण करणार आहे. या टॅगचा वापर सर्व डब्यांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी (ट्रॅकिंग ) केला जाणार आहे. आतापर्यन्त २३ हजार रेल्वेडब्यांमध्ये आरएफआयडी टॅग बसवण्यात आले आहेत. हा प्रकल्प अजूनही सुरु असून कोविड महामारीमुळे काही काळासाठी हे काम मंद गतीने सुरु आहे. सरकारने भारतीय रेलवेच्या सर्व डब्यांमध्ये आरएफआयडी टॅग लावण्यासाठी डिसेंबर २०२२ पर्यंतची मुदत निश्चित केली आहे. सध्या भारतीय रेलवे आपल्या सर्व रेल्वेडब्यांची माहिती लेखी स्वरूपात ठेवत आहे त्यामुळे त्यात त्रुटी असण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आरएफआयडी टॅगमुळे सर्व डब्यांचा, इंजिनांचा नेमका ठावठिकाणा जाणून घेणे सोपे होईल.
आरएफआयडी टॅग डबे जिथे बनतात तिथेच त्यावर लावले जातील, तर या टॅग साठीचे ट्रॅकसाईड रीडर्स रेलवे स्थानकांमध्ये आणि रेल्वे रुळांजवळ मोक्याच्या ठिकाणी बसवले जातील जेणेकरून डब्यांवरील टॅग दोन मीटर अंतरावरून शोधता येईल आणि डब्यांची ओळख पटवून ते संबंधित केन्द्रीय संगणकीय प्रणाली कडे पाठवले जाईल. यामुळे प्रत्येक डब्याची ओळख पटवली जाईल आणि जिथे तो डबा असेल , त्याचा ठावठिकाणा सापडू शकेल. आरएफआयडी टॅग प्रणाली सुरु झाल्यामुळे मालडबे , प्रवासी डबे आणि इंजिन टंचाईची समस्या जलद गतीने आणि अधिक पारदर्शक पद्धतीने सोडवण्यात मदत होईल अशी अपेक्षा आहे.