मुंबई – रेल्वे यात्रेकरूंसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. कारण त्यांची आता रेल्वे तिकीटांच्या वेटींगची कटकट दूर होणार आहे. त्यासोबतच गाड्यांची संख्याही वाढविण्यात येणार आहे. यासाठी सरकारने एक योजना तयार केली असून नव्या अर्थसंकल्पात नव्या रेल्वे लाईनवर विशेष फोकस करण्यात आले आहे. याचा लाभ हरियाणा व पंजाबसह संपूर्ण देशाला होणार आहे. संपूर्ण देशात २०२४ पर्यंत जवळपास १५० खासगी गाड्या धावणार आहेत.
नव्या रेल्वे लाईन टाकण्यासाठी गेल्या वर्षीच्या बजेटच्या तुलनेत यंदा दोन हजार कोटी रुपये जास्तीचे देण्यात येणार आहेत. १०९ मार्गांवर हरियाणा, पंजाबसह इतर राज्यांमध्ये खासगी कंपन्यांच्या दिडशे गाड्या धावतील. २०२४ चे लक्ष्य डोळ्यापुढे ठेवून हे काम होत आहे. अश्यात जुने रेल्वे रुळ काढून नवे टाकण्यासाठी मोठा खर्च होणार आहे. त्यामुळेच बजेट वाढले आहे. २०२०-२१ मध्ये जे बजेट ७० हजार २५० कोटींचे होते, तेच आता १ लाख १० हजार ५५ हजार कोटी रुपये करण्यात आले आहे. दोन हजार कोटी रुपये नव्या मार्गांसाठी अधिकचे देण्यात येणार आहे. तर रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण करण्यासाठी ५ हजार कोटी रुपये अधिकचे ठेवण्यात आले आहे. पीपीपी मार्गाने यात्रेकरूंना सुविधांमध्ये कसा लाभ पोहोचविता येईल, यावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.
नव्या डिझाईनसाठी ३७०४० कोटी
रेल्वे कोचमध्ये आधुनिक सुविधांसाठी आणि नव्या डिझाईनचे कोच बनविण्यासाठी ३७०४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गेल्यावर्षी यासाठी ३५०८६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. रोड सेफ्टी, रोड ओव्हर आणि अंडरब्रीजसाठी ५४९९.८५ कोटी रुपयांची तरतूद आहे. याशिवाय इलेक्ट्रीक प्रकल्पांसाठी देखील भक्कम तरतूद करण्यात आली आहे.